नागपूर : ( Farmers Revolt ) अमरावती बेलोराहून निघालेला कर्जमुक्ती महाएल्गार मार्च नागपूरच्या दिशेने येत असतानाच जामठयाजवळ थांबला. त्यानंतर थोड्या वेळाने परसोडी जवळील कापूस संशोधन केंद्राजवळील आंदोलन स्थळावर आंदोलक पोहाचले. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफीची अंमलबजावणी, शेतमालाला भाव, दिव्यांगांना मानधन व इतर मागण्यांसाठी १८२ किमीचा प्रवास करून नागपूरच्या दिशेने धडकलेला शेतकरी नेते व प्रहारचे संस्थापक बच्चू कडूंचा महाएल्गाराने वर्धा मार्गावर ठिय्या दिला आहे. परसोडी शिवाराजवळील कापूस संशोधन संस्थेजवळ कडूंसह शेतकरी रस्त्यांवर बसले.
मुख्यमंत्र्यांकडे चर्चेला जाण्यास नकार देत, त्यांनीच त्यांचे सहकारी पाठवावे, असा आग्रह धरला. या आंदोलनाचे पडसाद नागपूर शहरासह संपूर्ण बाह्य भागावर उमटले आहे. शहरात येणारे चहूबाजूचे महामार्गही शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी रोखून धरल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, रात्री उशिरा वर्धा मार्गावरचा काही भाग मोकळा करण्यात आला. त्यानंतर वाहतूक काही प्रमाणात सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू होते. तर, हजारो शेतकरी वर्धा मार्गावरील रस्त्यांवरही ठाण मांडून बसून आहेत. यात दिव्यांग बांधवांची संख्याही लक्षवेधी आहे. एवढेच नव्हे तर मोठया प्रमाणात वाहनांचा ताफाही आहे. यात ट्रक, ट्रॅक्टरसह बैलगाड्यांचाही समावेश आहे. जनावरेही सोबत आहेत. बुटीबोरीजवळ दुपारपासूनच जाम झाल्यानंतर उड्डाणपुलावरून कडूंचा ताफा नागपूरच्या दिशेने पुढे निघाला. वर्धा मार्गावरील कापूस संशोधन संस्थेजवळ त्यांना थांबा देण्यात आला होता. मात्र, त्यापूर्वीच शेतकऱ्यांसह कडू यांनी रस्त्यावरच ठाण मांडले.
रस्ता, उड्डाणपुलावरही ( Farmers Revolt ) मोठी गर्दी होती. 'आता मरायचं नाही, आता लढायचं' असे मोठे बॅनर व फलक हातात घेत शेतकरी सरकारचे लक्ष वेधत होते. या आंदोलनामुळे या मार्गावरून जाणाऱ्या अॅम्बुलंन्सही वाहतूक कोंडीत सापडल्या. २ ते ३ हजारांचा मोठा ताफा रस्त्यांवरच आहे. आंदोलकांनी सोबत मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थ आणले आहेत. यात तांदूळ, पीठ, चिवडा व इतर साहित्याचा समावेश आहे. एवढेच नव्हे तर स्वयंपाक करण्यासाठीची व्यवस्थाही सोबत आहे. सोलापूर, कोल्हापूर व राज्याच्या इतर भागातूनही शेतकरी आंदोलकांना मोठे खाद्यपदार्थ ट्रकमध्ये पाठविण्यात आले आहे. आंदोलनात पुरूषच नव्हे महिलांचाही मोठा सहभाग आहे. जवळपास ३० ते ४० हजारांवर शेतकरी रस्त्यांवर ठाण मांडून बसून आहेत.
या महाएल्गार आंदोलनाला ( Farmers Revolt ) राज्यातील सर्व प्रमुख शेतकरी नेत्यांनी एकत्रित पाठिंबा दिला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कार्यकर्त्यांसह आंदोलनस्थळी भेट दिली. विजय जावंधिया, माजी खासदार राजू शेट्टी, वामनराव चटप, डॉ. अजित नवले, राजन क्षीरसागर, प्रकाश पोहरे, दीपक केदार, प्रशांत डिक्कर, विठ्ठलराजे पवार, राष्ट्रवादीचे निलेश कऱ्हाळे यांच्यासह इतरही शेतकरी नेते आंदोलनस्थळावर आहेत. शेतकऱ्यांनी केवळ वर्धा मार्गच नव्हे तर भंडारा व अमरावती मार्गही ठप्प करण्याचा प्रयत्न केला. भंडारा मार्ग अडवून ठेवण्यात आला. तर, अमरावती मार्गावरील चित्रही काहीसे तसेच आहे. एवढेच नव्हे तर शहराच्या बाह्यभागातून जाणाऱ्या आऊटर रिंगरोडवरही शेतकऱ्यांनी ताबा घेतला आहे. आंदोलक गनीमी काव्याने शहरात घुसतील, याचा संशय असल्याने पोलिसांनी आधीपासूनच शहरात कडेकोट बंदोबस्त लावला आहे.
मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान ( Farmers Revolt ) रामगिरीसह धरमपेठ येथील निवासस्थान, रवीभवन, आमदार निवास आदींवरही पोलिसांची नजर आहे. विचारपूस केल्याशिवाय कोणालाही प्रवेश देण्यात येत नाही. तर, शहरातील उड्डाणपुलाच्या दोन्ही टोकावरही पोलिस नजर ठेवून आहे.
मुख्यमंत्री फडणवीस ( Farmers Revolt ) यांना मंगळवारीच बच्चू कडू यांनी मेसेज पाठवून बैठकीस अनुपस्थित राहण्याची सूचना केली होती. त्यामुळे ती बैठक रद्द करण्यात आली. मंगळवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री फडणवीस नागपुरात येणार असल्याची चर्चा आहे. ते आल्यावर निर्णायक हालचाली होण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, कडू यांनी मुख्यमंत्र्यांकडे जाण्यास रस न दाखविता त्यांचा दूत आंदोलनस्थळी यावा अशी अपेक्षा व्यक्त केल्याची माहिती पुढे आली.
सर्वसामान्यांना फटका
या आंदोलनाचा ( Farmers Revolt ) सर्वाधिक फटका सर्वसमान्यांना बसला. वर्धा, चंद्रपूर मार्गे येणारी सर्वप्रकारची वाहतूक ठप्प पडली होती. बसमध्येच हजारो प्रवासी अडकले. यात लहान मुलांसह महिला, वृध्दांचाही समावेश होता. अनेकांना आठ ते नऊ तास बसमध्येच बसून राहावे लागले. अनेक अॅम्बुलंन्सही अडकल्या होत्या. नंतर त्या सोडण्यात आल्या. बसमध्ये काही आजारी रूग्णही असल्याची माहिती आहे. प्रवासी व नागरिकांना वेठीस धरल्याने आंदोलकांवर तीव्र संतापही व्यक्त करण्यात येत होता.