Banana Farmers Protest : केळी पेक्षा भंगार महाग ! शेतकऱ्यांचा आक्रोश उसळला

Top Trending News    03-Nov-2025
Total Views |
 

banana 
 जळगाव : ( Banana Farmers Protest ) बाजारात केळीला चांगली मागणी असतानाही व्यापाऱ्यांची मनमानी कारभार सुरु आहे. शेतकऱ्यांचे नुकसान दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. व्यापारी सध्या केळीचा उठाव कमी असल्याचे सांगून कमीत कमी दरात केळीची खरेदी करीत आहेत. याचा फटका जिल्ह्यातील हजारो केळी उत्पादकांना बसला आहे. ही स्थिती लक्षात घेऊन जळगाव तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी शनिवारी किनोद येथे जनआक्रोश मोर्चा काढला.
 
जिल्ह्यात तब्बल चार मंत्री असतानाही कोणीच लक्ष देण्यास तयार नाही. केळीला ( Banana Farmers Protest ) गेल्या अनेक दिवसांपासून चांगले भाव नसल्याने शेतकऱ्यांना खूप मोठे नुकसान सोसावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर, संतप्त केळी उत्पादकांनी शनिवारी किनोद (ता. जळगाव) येथे जनआक्रोश मोर्चा काढून शासनासह लोकप्रतिनिधींचा तीव्र निषेध केला. सध्या बाजार समित्यांकडून जाहीर होणारे भाव केवळ नावापुरते राहिले आहेत. व्यापारी प्रत्यक्ष व्यवहारात त्या दरापेक्षा खूपच कमी म्हणजे निम्म्यापेक्षा कमी भाव देत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.
 
राज्यात भंगाराला ४० रूपये किलोचा भाव आहे मात्र केळी ३ रूपये दराने विकावी लागत आहे. या दयनीय परिस्थितीवर यावेळी मोर्चेकऱ्यांनी शासनाला प्रश्न विचारला आहे. केळीला उत्पादन खर्चाच्या तुलनेत समाधानकारक भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी ( Banana Farmers Protest ) झाली आहे. एप्रिल आणि मे महिन्यांत केळीच्या दरात काही प्रमाणात स्थिरता होती. मात्र जूनपासून भाव घसरत गेले.
 
अशा आहेत मागण्या
 
कृषी उत्पन्न बाजार समितीने व्यापारी आणि शेतकऱ्यांना सोबत घेऊन केळीचे भाव स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न करावे. तसेच जिल्हा नियोजन समितीच्या निधीमध्ये शेतकऱ्यांसाठी १० टक्के निधी राखीव ठेवावा. दलालांकडून होणारी केळी उत्पादक शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवावी, या काही मागण्यांकडे मोर्चात सहभागी केळी उत्पादकांनी लक्ष वेधले.