नागपूर : ( Nagpur Doordarshan ) विदर्भाचे वाढते प्रशासकीय महत्व, सामाजिक-सांस्कृतिक विविधता आणि राष्ट्रीय पातळीवर परिणाम करणारे घडामोडी लक्षात घेता नागपूर येथून नियमित दूरदर्शन वार्तापत्र सुरू करण्याच्या मागणीने जोर धरत आहे. या संदर्भात केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाला पत्र पाठविण्यात आले आहे. दूरदर्शन नागपूरकडे ( Nagpur Doordarshan ) वार्तापत्र प्रसारणाची संपूर्ण क्षमता उपलब्ध आहे. नागपूरहून दररोज 10 ते 15 मिनिटांचे नियमित वार्तापत्र तात्काळ सुरू करता येईल. विदर्भाचा आवाज राष्ट्रीय माध्यमांमध्ये पोहोचणे अतिशय आवश्यक आहे. महाराष्ट्रातील विदर्भ विभाग ११ जिल्ह्यांमध्ये पसरलेला असून मोठ्या प्रमाणावर आदिवासी लोकसंख्या या भागात राहते. काही जिल्हे नक्षलग्रस्त असल्याने येथील समस्या, उपलब्धी आणि स्थानिक घटना मुंबई केंद्रातून प्रसारित होणाऱ्या राज्यस्तरीय बुलेटिनमध्ये पुरेशा प्रमाणात दिसत नाहीत.
नागपूर दूरदर्शन केंद्र
नागपूर देशाचे भौगोलिक केंद्र आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ऐतिहासिक कर्मभूमी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय येथे आहे. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन दरवर्षी नागपुरात भरते, ज्यामुळे शहराचे राजकीय व प्रशासकीय महत्त्व अधिक वाढते. तसेच शिक्षण, आरोग्य, पर्यटन, वन्यजीव संवर्धन आणि रेल्वे व्यवस्थापन या क्षेत्रांमध्ये नागपूरने राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची ओळख निर्माण केली असे डॉ. डबली यांनी पत्रात नमुद केले आहे. ( Nagpur Doordarshan ) या विभागाचा आवाज राष्ट्रीय पातळीवर दबला जातो. याचाच विपरीत परिणाम स्थानिक विकास व धोरण निर्मितीवर होत असल्याकडे सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रवीण डबली यांनी लक्ष वेधले आहे. त्यांनी याबाबत केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव आणि मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांना ईमेलद्वारे निवेदन देऊन ही सेवा त्वरित सुरू करण्याची मागणी केली आहे. हे फक्त प्रादेशिक संतुलनासाठीच महत्त्वाचे नाही, तर देशातील लोकशाही संवादव्यवस्थेलाही अधिक मजबूत करणारे आहे, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
स्थानिक अहवालांनुसार नागपूरचे ( Nagpur Doordarshan ) अनालॉग टेरेस्ट्रियल प्रसारण ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी बंद करण्यात आले. मात्र केंद्राकडे वार्तानिर्मिती आणि प्रसारणासाठी आवश्यक तांत्रिक व्यवस्था कायम आहे. पूर्वी मर्यादित कालावधीसाठी काही वार्ता-आधारित कार्यक्रम तयार झाले, पण नियमित वार्तापत्र कधीही स्थायीपणे सुरू झाले नाही. नागपूर दूरदर्शन केंद्राची स्थापना १५ ऑगस्ट १९८२ रोजी झाली होती. स्टुडिओ, संपादन कक्ष, रेकॉर्डिंग सुविधा, सॅटेलाइट लिंक आदी तांत्रिक साधने आजही उपलब्ध आहे.
नागपूरचे राष्ट्रीय स्थान
नागपुरात एनएडीटी, सीएसआयआर, नीरी, नॅशनल फायर सर्विस कॉलेज आणि भारतीय रेल्वेचे दोन मंडळ कार्यालये आहेत. येथून दररोज प्रशासन, संशोधन आणि सार्वजनिक महत्त्वाच्या बातम्या ( Nagpur Doordarshan ) निघतात. नियमित वार्तापत्र सुरू झाल्यास या माहितीचा राष्ट्रीय पातळीवर त्वरित प्रसार होऊ शकतो. तसेच विदर्भातील संत्री आणि कापूस उत्पादन देशाच्या अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा वाटा आहे. गडचिरोली आणि चंद्रपूर सारख्या जिल्ह्यांतील वन्यजीव, जंगल आणि पर्यटन क्षेत्राशी संबंधित बातम्यांचीही सखोल कव्हरेज आवश्यक आहे.