नागपूर : ( Bogus Teacher Recruitment ) बोगस शिक्षक भरतीप्रकरणी स्थापन केलेल्या चौकशी समितीने तपासाचे काम सुरू केले आहे. या अनुषंगाने सर्व संबंधित विभागांतील अधिकाऱ्यांना पुण्यात बोलावण्यात आले असून, शाळेची संच मान्यता, शालार्थ आयडी वाटपाची प्रक्रिया तसेच भरती प्रक्रियेतील सर्व कागदपत्रांची सखोल तपासणी केली जात आहे. प्रत्येक कागदपत्रांची बारकाईने छाननी केली जात असून त्याची उलट तपासणीही सुरू आहे. शिक्षण उपसंचालक (डीडी) कार्यालय व वेतन पथक विभाग समितीच्या विशेष लक्षात आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मुख्याध्यापक पदावर बोगस भरतीचा प्रकार उघड
पराग पुडके या व्यक्तीस बनावट कागदपत्रांच्या आधारे शालार्थ आयडी ( Bogus Teacher Recruitment ) देण्यात आला आणि त्यानंतर त्याची मुख्याध्यापक पदावर नियुक्ती करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या संदर्भात सदर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, त्यानंतर प्रकरण अधिक गंभीर झाले आहे. सायबर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. शासनानेही शिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित केली आहे.
पुण्यात अधिकारी, कडक चौकशी सुरू
सूत्रांच्या माहितीनुसार, उपसंचालक, माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील कर्मचारी आणि वेतन पथकातील अधिकाऱ्यांना पुण्यात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तेथील समिती शाळेच्या संच मान्यता प्रक्रिया, शालार्थ आयडी वाटप ( Bogus Teacher Recruitment ) व संबंधित कागदपत्रांची बारकाईने छाननी करत आहे. काही अधिकाऱ्यांना जुने तपशील आठवण्यात अडचणी येत असून, समिती त्यांच्यावर नाराजी व्यक्त करत असल्याचे कळते.
वेतन पथक व माध्यमिक शिक्षण विभाग रडारवर
माध्यमिक शिक्षण व वेतन पथक विभाग सध्या चौकशीच्या केंद्रस्थानी असून त्यांच्याकडील कागदपत्रांची स्थिती समाधानकारक नसल्याची चर्चा आहे. काही अधिकारी अजूनही शिक्षकांना फोन करून मार्गदर्शन करत असल्याचे बोलले जात आहे.
स्वाक्षऱ्यांची उलट तपासणी शक्य
पुडके प्रकरणात माजी शिक्षणाधिकारी पटवे यांनी सादर केलेल्या प्रस्तावांवर बोगस स्वाक्षऱ्या असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या इतर भरती प्रकरणांतही स्वाक्षऱ्यांची उलट तपासणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.