नागपूर : ( Krishna Khopde ) औरंगजेबाच्या कबरीच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी उभारलेल्या आंदोलनानंतर नागपुरात उसळलेल्या दंगलीला एक महिना उलटून गेला आणि आता काँग्रेसने काढलेली सद्भावना रॅली ही एक ‘नौटंकी’ आहे. ही सरळ सरळ लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे, असा घणाघात भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी केला आहे.
आमदार खोपडे ( Krishna Khopde ) पुढे म्हणाले, जेव्हा दंगल झाली, तेव्हा एकही काँग्रेस नेता तिथे दिसला नाही. जेव्हा दंगेखोरांनी हिंदूंची घरे पेटवली, दगडफेक केली, घरात घुसून मारहाण केली, पोलिसांवर हल्ला केला तसेच वाहने पेटवली, हे घडत असतांना काँग्रेस कुठे होती. पोलिस अधिकाऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला झाला तेव्हा काँग्रेसचे नेते कुंभकर्णासारखी झोपली होती. त्यामुळेच या दंगलीत काँग्रेसच्या सहभागाबाबत शंका निर्माण होते, असे ते म्हणाले.
राज्यपालांचा रिपोर्ट सार्वत्रिक करा
दंगलीची चौकशी करण्यासाठी काँग्रेसने माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सत्यशोधन समिती स्थापन केली होती. खोपडे यांच्या म्हणण्यानुसार या समितीमध्ये अकोल्याच्या दंगलप्रकरणातील आरोपी साजिद पठाण याचा समावेश होता. समितीने एकाही पीडित हिंदू कुटुंबाला भेट दिली नसून दंगलग्रस्त भागांचा दौरा केला नाही. तर, काँग्रेस नेत्याच्या घरात बसून रिपोर्ट तयार केला. खोपडे यांनी काँग्रेसने राज्यपालांना दिलेला रिपोर्ट सार्वजनिक करण्याची मागणी केली.