मुंबई : ( Ramesh Chennithala ) केंद्रातील मोदी सरकार हे हुकूमशाही पद्धतीने काम करत असून, विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी ईडी आणि सीबीआयचा गैरवापर करत आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केला आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरोधातील ईडीची कारवाई ही पूर्णतः राजकीय सूडबुद्धीने प्रेरित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
चेन्नीथला ( Ramesh Chennithala ) म्हणाले की, "या कारवायांनी काँग्रेसचे मनोधैर्य खचणार नाही. उलट आम्ही अधिक ताकदीने भाजपाच्या हुकूमशाही विरोधात लढा देऊ." त्यांनी केंद्र सरकारच्या कारवायांचा तीव्र निषेध करत देशभर काँग्रेसने दोन दिवस आंदोलन केले असल्याची माहिती दिली. महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्येही निषेध आंदोलन झाले.
लाडकी बहिण योजनेवर टीका
महायुती सरकारवर टीका करत चेन्नीथला म्हणाले की, "लाडकी बहिण योजना ही केवळ निवडणुकीपूर्वीचे गाजर होते. सुरुवातीला 2100 रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र आता केवळ 500 रुपये दिले जात आहेत. ही योजना म्हणजे लाभार्थी महिलांची फसवणूक आहे." प्रदेश आणि जिल्हा कार्यकारिणीत लवकरच बदल होणार असून महाबळेश्वर येथे काँग्रेसचे विशेष शिबीर आयोजित केले जाणार असल्याची माहितीही त्यांनी ( Ramesh Chennithala ) दिली.
विरोधी धोरणांवर आवाज बुलंद
या पार्श्वभूमीवर गुरुवारी काँग्रेसच्या खासदारांची बैठक झाली. पक्षाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केंद्र व राज्य सरकारच्या जनविरोधी धोरणांविरोधात सभागृहात आणि रस्त्यावर आवाज उठवण्याचे ठरवण्यात आले. संवाद व समन्वयाच्या रणनितीवरही यावेळी चर्चा झाली.
मोदी सरकारकडून सुरु असलेल्या ईडी, सीबीआयच्या गैरवापराविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने प्रभारी रमेश चेन्नीथला ( Ramesh Chennithala ) यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात दादर येथील इंडिया बुल्स जवळ आंदोलन केले. या आंदोलनात विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते आ. विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, माणिकराव ठाकरे, आ. नाना पटोले, नसीम खान, खा. चंद्रकांत हंडोरे, खा. रजनीताई पाटील, खा. प्रणिती शिंदे, खा. श्यामकुमार बर्वे, माजी मंत्री अॅड. यशमोती ठाकूर, शिवाजीराव मोघे, वसंत पुरके, डॉ. विश्वजीत कदम, खा. डॉ. कल्याण काळे, खा. रविंद्र चव्हाण, खा. नामदेव किरसान, खा. बळवंत वानखेडे, खा. डॉ. शोभा बच्छाव, खा. डॉ. शिवाजी काळगे आदी नेते सहभागी झाले होते. पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेऊन नंतर त्यांची सुटका केली.