लाखांदूर : ( Teacher Salary Scam ) दिघोरी येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात फक्त 3 घड्याळी तासिका शिक्षक कार्यरत असताना ही 5 शिक्षकांचे पगार बिल पंचायत समितीकडे ( Teacher Salary Scam ) पाठवण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. या संदर्भातच शाळेतीलच संदीप मेश्राम आणि सुरज बावणे या दोन घड्याळी तासिका शिक्षकांनी गटशिक्षणाधिकारी तत्त्वराज अंबादे यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
शाळेत इयत्ता 5 वी ते 12 वी पर्यंत वर्ग असून काही विभाग नियमित शिक्षकांच्या तुटवड्यामुळे घड्याळी तासिका शिक्षकांवरच अवलंबून आहेत. तरीही शाळा प्रशासनाने केवळ 3 शिक्षक कार्यरत असतानाही 5 शिक्षकांचे पगार शासनाकडे सादर करून शासनाची दिशाभूल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा प्रकार गेल्या दीड वर्षांपासून सुरू असल्याची माहितीही समोर आली आहे.
विशेष म्हणजे कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांचे पगारही प्राथमिक विभागाच्या नावाने काढले जात असल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. या गैरव्यवहाराची तक्रार मुख्याध्यापकांच्या निदर्शनास आणून दिली असता, त्यांनी तक्रारदार व अधिकाऱ्यांशी अर्वाच्य भाषेत वागणूक दिल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. गटशिक्षणाधिकारी तत्त्वराज अंबादे यांनी तक्रारीची गंभीर दखल घेतली असून, चौकशी केली जाणार असल्याचे सांगितले आहे.