Nitin Gadkari : "व्यवहारात उपयोगी शिक्षण गरजेचे, राष्ट्रीय शैक्षणिक परिषदेतील गडकरींचा संदेश"

Top Trending News    21-Apr-2025
Total Views |

nitin
 
नागपूर : ( Nitin Gadkari ) शिक्षणाचा संबंध जसा ज्ञानाशी आहे. आपल्याला असलेल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी होत असेल तर त्याचे महत्त्व अधिक वाढत असते. त्यादृष्टीने लोकांचे दैनंदिन जगणे सुसह्य करणारे शिक्षण देणे आता काळाची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी ( Nitin Gadkari ) यांनी केले.
 
विदर्भ गौरव प्रतिष्ठान आणि यशवंतराव चव्हाण सेंटर नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय शैक्षणिक परिषदेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी शिक्षण क्षेत्रातील मंडळींसोबत संवाद साधला. यावेळी शिक्षणतज्ज्ञ पद्मश्री डॉ. जी. डी. यादव, सच्चिदानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, राजाभाऊ टांकसाळे, महेश बंग आदींची प्रमुख उपस्थिती होती.
 
 
गडकरी ( Nitin Gadkari ) म्हणाले, ‘शिक्षण क्षेत्रात होणारे बदल स्वीकारून, ते आत्मसात करून कसे काम करावे, यावर मंथन करण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले, ही आनंदाची बाब आहे. आपण अश्या कार्यक्रमांचे आयोजन करत असतो तेव्हा एक धोरण ठरवत असतो. त्यादृष्टीने सर्वांत आधी शिक्षणाचे उद्दिष्ट समजून घेतले पाहिजे. आपले शिक्षण उद्याचा नागरिक घडविण्यासाठी आहे आणि त्याच्यावर संस्कार करण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे, ही बाब प्रत्येकाने ध्यानात ठेवण्याची आवश्यकता आहे.’
 
आपण जो विद्यार्थी घडवतोय, तो भविष्यात कश्या प्रकारचा नागरिक असेल, याचे उत्तर आज देणे शक्य नाही. कारण परिपूर्णतेची खात्री कुणीही देऊ शकत नाही. पण प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांमधील गुण ओळखता येतील का, त्या गुणांना विकसित करता येईल का आणि त्याच गुणांच्या आधारावर भविष्यात रोजगार मिळविता येईल का, याचा विचार करावा लागेल, असेही गडकरी म्हणाले.