Ramdas Athawale : "आढावा बैठकीत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा ठाम पवित्रा"

Top Trending News    21-Apr-2025
Total Views |
 
athvale
 
नागपूर : ( Ramdas Athawale ) केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले ( Ramdas Athawale ) यांनी आज सामाजिक न्याय विभागाच्या योजनांसह केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांच्या अंमलबजावणीबाबत नागपूर विभाग व जिल्ह्याचा आढावा घेतला.
 
येथील रविभवनात राज्यमंत्री आठवले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या आढावा बैठकीस अपर आयुक्त आदिवासी विभाग नागपूर आयुषी सिंह, अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, विभागीय आयुक्त कार्यालयाचे विकास उपायुक्त कमलकिशोर फुटाणे, पुरवठा उपायुक्त अनिल बन्सोड, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाबासाहेब देशमुख, समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
 
या बैठकीत केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता विभाग आणि दिव्यांग कल्याण विभागाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या योजनांची नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये व नागपूर जिल्ह्यातील अंमलबजावणीबाबतची माहिती आठवले यांनी जाणून घेतली. समाज कल्याण विभागाच्यावतीने अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना देण्यात येणारी शिष्यवृत्ती, वसतीगृहे, ॲट्रॉसिटी, प्रकरणांची स्थिती, व्यसनमुक्ती केंद्र, वृद्धाश्रम आदींसह दिव्यांग कल्याण विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहितीही त्यांनी जाणून घेतली.
 
आदिवासी विकास विभागाच्यावतीने विभागात सुरु असलेली वसतीगृहे, एकलव्य पब्लिक स्कुल,नामांकित शाळा,सैनिकी शाळा आदींची माहिती त्यांनी घेतली. यासोबतच केंद्र शासनाच्या जनधन,मुद्रा,प्रधानमंत्री आवास, आयुष्यमान भारत या महत्वाकांक्षी योजनांच्या अंमलबजावणीची स्थितीही त्यांनी जाणून घेतली.