Nagpur Power Outage : ऊर्जामंत्र्यांच्या शहरात अंधार ! सत्ताधाऱ्यांनाच करावं लागतंय बंड

Top Trending News    23-Apr-2025
Total Views |
 
elecrti
 
नागपूर : ( Nagpur Power Outage ) महाराष्ट्रात कोणतेही सरकार असो महायुतीचे की महाविकास आघाडीचे ऊर्जामंत्री मात्र नेहमीच नागपूर जिल्ह्यातीलच असतात. चंद्रशेखर बावनकुळे आणि नितीन राऊत यांच्यानंतर सध्या खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ऊर्जा विभाग आहे. मात्र, असे असतानाही नागपूर शहरातील वीजपुरवठा विस्कळीत ( Nagpur Power Outage ) होत असून नागरिक त्रस्त झाले आहेत.
 
मुख्यमंत्री फडणवीस यांनी पूर्व नागपूरसाठी ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. ट्रान्सफॉर्मर, सबस्टेशन, केबल्स यांसाठी हा निधी वापरण्यात यावा, असे उद्दिष्ट असतानाही कामांचा वेग अत्यंत संथ आहे. त्यामुळे महावितरणच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण ( Nagpur Power Outage ) झाले आहे.
 
 
पूर्व नागपूरमधील वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याविरोधात भाजपाचे माजी नगरसेवक बाल्या बोरकर यांनी कार्यकर्त्यांसह वाठोडा पॉवर स्टेशन आणि हिवरीनगर वीज कार्यालयात धरणे आंदोलन केले. लकडगंज झोन मधील अनेक भागांमध्ये गरोबा मैदान, कुंभार टोली, दत्ता नगर, बाबुलवण, हिवरी नगर, सिम्बायोसिस परिसर रोज वीज गायब होत आहे. नागरिकांच्या तक्रारी असूनही महावितरण दुर्लक्ष करत असल्याचा आरोप बोरकर यांनी केला.
 
आंदोलनादरम्यान कार्यकारी अभियंता टेकाडे, अतिरिक्त अभियंता बारापात्रे यांना निवेदन देत वीजपुरवठा अखंडित करण्याची मागणी करण्यात आली. सलग चार वेळा भाजपचे आमदार निवडून आलेल्या भागातसुद्धा मूलभूत सुविधा उपलब्ध नसणे, ही दुर्दैवी बाब असल्याचे नागरिकांनी सांगितले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने सुरू असलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पातसुद्धा वीज समस्येमुळे अडथळा निर्माण होत आहे. या आंदोलनात अनेक स्थानिक कार्यकर्त्यांसह नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला.