श्रीनगर : ( Kashmir Valley Shutdown ) पहलगाम येथे झालेल्या जीवघेण्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी संपूर्ण काश्मीर खोऱ्यात ३५ वर्षांनंतर प्रथमच एकदिवसीय बंद पाळण्यात आला. या बंदला समाजातील सर्व स्तरांतील लोकांचा आणि विविध संघटनांचा व्यापक पाठिंबा मिळाला. खोऱ्याच्या प्रत्येक भागात विशेषतः पर्यटकांच्या आवडत्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली होती. श्रीनगरमधील बहुतेक दुकाने, पेट्रोल पंप आणि व्यवसायिक प्रतिष्ठाने बंद राहिली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी ( Kashmir Valley Shutdown ) दिली. जीवनावश्यक सेवा सुरू होत्या, तर सार्वजनिक वाहतूक मर्यादित स्वरूपात कार्यरत होती. मात्र, खासगी वाहनांची वर्दळ नियमित होती.
खाजगी शाळांनीही बंदला पाठिंबा दिला तर सरकारी शाळा सुरु होत्या. बंदचा प्रभाव इतर जिल्ह्यांमध्येही दिसून आला. अनेक ठिकाणी शांततापूर्ण निदर्शने करण्यात आली. ज्यामध्ये निष्पाप लोकांच्या हत्या थांबवण्याची जोरदार मागणी करण्यात आली. या बंदच्या आवाहनाला नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, पीपल्स कॉन्फरन्स आणि अपनी पार्टी या प्रमुख राजकीय पक्षांबरोबरच सामाजिक, धार्मिक संघटना, व्यापारी वर्ग आणि नागरी समाज संस्थांनीही सक्रिय पाठिंबा दिला.