
गुवाहाटी : ( Pahalgam Attack ) पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती आहे. दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग असल्याबद्दल भारताने विविध राजनैतिक अधिकाऱ्यांना काही गुप्तचर माहिती दिल्याचा दावा केला जात आहे. या हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे भारताने स्पष्टपणे म्हटले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर ( Pahalgam Attack ) भारतात राहून पाकिस्तानचे समर्थन करणाऱ्या किमान 27 जणांना राज्यात आतापर्यंत अटक करण्यात आली आहे, असे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी सांगितले. अटकेची ही संख्या रात्री पर्यंतची आहे.
आतापर्यंत अटक करण्यात आलेल्यांमध्ये विरोधी पक्ष ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटचे (एआययूडीएफ) आमदार अमीन-उल-इस्लाम यांचा समावेश आहे, ज्यांच्यावर पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग आणि पाकिस्तानचे समर्थन केल्याबद्दल देशद्रोहाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' वर सांगितले.