दिल्ली : ( Border Train Shift ) भारत पाकिस्तान हल्ल्यानंतरच्या तणावाच्या स्थितीमुळे भारतीय सीमा हद्दीतल्या काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असून काही रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक बदलविण्याचा निर्णय भारतीय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. सुरक्षेचा भाग म्हणून रेल्वे विभागाकडून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले, महत्त्वाचे म्हणजे जम्मू काश्मीर, पंजाब राजस्थान आणि गुजरात मधील रेल्वेच्या सेवेवर याचा मोठा परिणाम झाला आहे.
नियंत्रण रेषेवर तणाव आहे. राजस्थानच्या बाडमेर, बिकानेर, जैसलमेर, जोधपूर, गंगानगर, हनुमानगड या जिल्ह्यांमध्ये संपूर्ण हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. ड्रोन उडवण्यास पूर्णपणे बंदी आहे. सीमावर्ती भागात पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले झाले आहेत. अशा परिस्थितीत, भारत-पाकिस्तान ( Border Train Shift ) आंतरराष्ट्रीय सीमा क्षेत्र, लष्करी छावणी क्षेत्र रेड झोनमध्ये समाविष्ट करण्यात आले असून, येथील गावातील लोकांचे अन्यत्र स्थलांतरण करण्यात आले आहे. आता सुरक्षेचा भाग म्हणून रात्री अंधाराच्या वेळी रेल्वे वाहतुकीची परवानगी नाकारण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसात या राज्यांमध्ये ब्लॅकआऊट पाळण्यात आला. शिवाय सुरक्षेचे सर्व नियम पाळण्यात आले. आता रेल्वे वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत.