नागपूर : ( Shalarth Scam Twist ) बोगस शालार्थ आयडी घोटाळ्यातील आरोपींना एक नाट्यमय सुटका मिळाली आहे. बोगस कागदपत्रांच्या आधारे शालार्थ आयडी बनवून पराग पुडके यांना शाळेचा मुख्याध्यापकपदी पदोन्नती देण्यात आली होती. हे प्रकरण पुढे आल्यानंतर पोलिसांनी उपसंचालक उल्हास नरड आणि पराग पुडके या दोघांना अटक केली होती. तपासादरम्यान सूरज नाईक आणि नीलेश मेश्रामसह संजय बडोदकर यांनाही अटक झाली होती. अभियोजन पक्षानुसार आरोपींनी मिळून 580 बोगस शालार्थ आयडी ( Shalarth Scam Twist ) जारी केले. या माध्यमातून बोगस शिक्षकांना पगार मिळत होता. यामुळे सरकारचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
बोगस शालार्थ आयडी घोटाळ्यातील ( Shalarth Scam Twist ) आरोपी शिक्षण विभागाचे उपसंचालक उल्हास नरड, उपसंचालक कार्यालयात शिक्षण उपनिरीक्षक संजय बडोदकर, माध्यमिक शिक्षण विभागातील अधीक्षक नीलेश मेश्राम व सूरज नाईक यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. बी. ओझा यांच्या न्यायालयाने गुरुवारी जामीन मंजूर केला आहे. तसेच, पराग पुडके यालाही जामीन मंजूर करण्यात आला आहे. सदर ठाण्यात या सर्वांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. विशेष म्हणजे या सर्व आरोपींना सायबर ठाण्यात नोंद प्रकरणात बुधवारीच जामीन मिळाला होता.
बचावपक्षाचे वकील कमल सतुजा, कैलाश डोडानी, अनमोल गोस्वामी आणि अशिका जैन यांनी न्या. ओझा यांच्या न्यायालयात बडोदकर यांच्या बाजूने जामीन अर्ज दाखल केला. त्यांनी न्यायालयाला सांगितले की, बडोदकर यांना या प्रकरणात चुकीच्या पद्धतीने अडकविण्यात आले आहे. पोलिसांच्या एफआयआरमध्येही त्यांचे नाव नव्हते. ते तपासात सहकार्य करण्यास तयार आहेत. त्यामुळे त्यांना जामीन मिळाला पाहिजे. सदरचे ठाणेदार आणि तपास अधिकारी मनीष ठाकरे यांनी जामीन देण्यास विरोध केला. सर्वच पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने बडोदकरसह इतरांना सशर्त जामीन मंजूर केला.