Bhujbal Effect : भुजबळांच्या एंट्रीने वाढली 3 नेत्यांची डोकेदुखी, राजकारणात नवा ट्विस्ट

Top Trending News    21-May-2025
Total Views |

bhuj
 
नाशिक - ( Bhujbal Effect ) नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी राष्ट्रवादी, भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनाही आग्रही आहे. जिल्ह्यात सर्वाधिक आमदार असल्याने पालकमंत्रिपद आपल्याकडेच असावं, असा राष्ट्रवादीचा आग्रह आहे. तर दुसरीकडे, शिवसेनेचे वजनदार नेते असलेले दादा भुसे याच जिल्ह्यातून येत असल्याने पालकमंत्रिपद मिळवण्यासाठी तेही प्रयत्नशील आहे. यातच नाशिकमध्ये लवकरच कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येणार असल्याने या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळवण्यासाठी भाजपकडूनही जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
 
अशात पालकमंत्री पदासाठी भाजपकडून गिरीश महाजन यांचे नाव आघाडीवर असून प्रजासत्तादिनी त्यांच्या हस्तेच जिल्ह्यात झेंडावंदनही पार पडले. आता मात्र राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री माणिकराव कोकाटे, शिवसेनेचे मंत्री दादा भुसे आणि भाजपचे मंत्री गिरीश महाजन या तीन नेत्यांमध्ये नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी चढाओढ सुरू असतानाच छगन भुजबळ ( Bhujbal Effect ) यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्याने आता या स्पर्धेत नव्या भिडूची एंट्री झाली आहे आहे. त्यामुळे नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा महायुतीकडून नेमका कसा सोडवला जाणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
 
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ ( Bhujbal Effect ) यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील गच्छंतीनंतर रिक्त झालेल्या जागेवर भुजबळांची मंत्रिपदी वर्णी लागली. मुंबईत पार पडलेल्या या शपथविधीमुळे नाशिकच्या पालकमंत्रिपदाच्या स्पर्धेत असणाऱ्या तीन नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे. कारण अनेक वर्षे मंत्रिपदाचा अनुभव असणारे छगन भुजबळ हे देखील आता पालकमंत्रिपदासाठी दंड थोपटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.