Nashik Political News : नाशिकमध्ये राजकीय भूकंप ! ठाकरेंचे नेता शिंदे गटात, भुजबळांना शह देण्याचा डाव ?

Top Trending News    26-May-2025
Total Views |

im 
नाशिक : ( Nashik Political News ) माजी आमदार नरेंद्र दराडे यांनी शिवसेना ठाकरे पक्षाची साथ सोडली असून त्यांनी उपमुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. तर आमदार दराडे यांना प्रवेश देऊन शिंदे गटाने येवल्यात भुजबळांना शह देण्याचा प्रयत्न केला. मात्र, चौकशी आणि कारवाईचे शुक्लकाष्ठ लागू नये, यासाठी दराडेंनी सत्ताधारी पक्षाचा आश्रय घेतल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. शिवसेना एकसंघ असताना नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था गटामधून उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र दराडे यांना आमदारकीची संधी दिली होती.
अलीकडेच त्यांच्या आमदारकीची मुदत संपली. त्यांचे बंधू किशोर दराडे हे शिंदे गटात आहेत. त्यामुळे, नरेंद्र दराडे हे देखील शिंदे गटात जाणार अशी चर्चा काही दिवसांपासून होती. महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका झाल्यानंतर लगेचच विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक होणार आहे. येवला तालुक्यात दराडे हे मंत्री छगन भुजबळ यांचे प्रबळ राजकीय विरोधक असून, दराडे विरुद्ध भुजबळ यांचा संघर्ष सर्वश्रृत ( Nashik Political News ) आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत दराडेंनी महाविकास आघाडीचे उमेदवार माणिकराव शिंदे यांच्यामागे बळ उभे केले होते. त्यामुळे भुजबळ विरुद्ध दराडे असा संघर्ष रंगला होता. या वादातूनच दराडे यांच्यामागे बनावट लेटर हेड प्रकरण लागले होते. आता दराडे यांनी भुजबळांच्या त्रासापासून संरक्षण मिळवण्यासाठी शिंदे गटाची निवड केली आहे. आगामी काळात भुजबळ आणि दराडे यांच्यात सामना रंगणार असल्याचे चित्र आहे.