Mens Commission Demand : राजकारण तापणार ? पुरुष आयोगावरून मनसे आक्रमक

Top Trending News    30-May-2025
Total Views |

ashish
 
पुणे : ( Mens Commission Demand ) राज्यात पुरुषांचा छळ, खोट्या केसेस दाखल करणे, यासारखे प्रकार सर्रास सुरू आहेत. ज्याप्रमाणे महिलांवर अत्याचार होतात त्याचप्रमाणे पुरुषांवरही अत्याचाराच्या घटना, त्यांनी केलेल्या आत्महत्या याचाही विचार व्हायला हवा. त्यामुळे पुरुषांना दाद मागण्यासाठी आणि न्याय मिळवून देण्यासाठी राज्यात राज्य पुरुष आयोग स्थापन करण्यात यावा, अशी मागणी मनसे नेते आशिष साबळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे ( Mens Commission Demand ) केली आहे.
 
देशभरात पुरुषांचा छळ आणि मानसिक अत्याचार याचे प्रमाण 51.5 टक्के असल्याचा उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे. पुढील 4 ते 5 दिवसांत मनसेचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे आशिष साबळे यांनी सांगितले. सध्या पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणावरून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. हा विषय अत्यंत संवेदनशील असून त्या संपूर्ण कुटुंबाला जन्मठेप हीच शिक्षा मिळावी, अशी सर्वांची संतप्त प्रतिक्रिया आहे.
 
राज्यात अशा प्रकारच्या अनेक घटना घडत असून त्यात पुरुषांचाही मानसिक छळ, खोट्या केसेस दाखल करणे, तसेच घटस्फोट घेताना लाखोंची, करोडोची, पोटगी मागणी हे प्रकारही सर्वत्र सुरू आहेत. या प्रकारामुळे पुरुषांना विनाकारण मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहेत. त्यामुळे, या प्रकरणात योग्य दाद मागण्यासाठी व्यासपीठ असावे, म्हणून 'पुरुष आयोग' स्थापन करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.