मुंबई : ( Abu Salem Verdict ) मुंबईत मार्च 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कुख्यात गुंड अबू सालेमने केवळ 19 वर्षे तुरुंगवास भोगला आहे. अद्याप त्याचा कारावास पूर्ण झालेला नाही, असे राज्य सरकारच्या वतीने उच्च न्यायालयाला सांगण्यात आले आहे. न्या. गिरीश कुलकर्णी आणि न्या. अद्वैत सेठना यांच्या खंडपीठासमोर गृह विभागाचे सहसचिव सुग्रीव धापटे यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यावेळी न्यायालयाला उपरोक्त माहिती देण्यात आली. सालेमला नोव्हेंबर 2005 मध्ये पोर्तुगालमधून प्रत्यार्पण करण्यात ( Abu Salem Verdict ) आले. 28 फेब्रुवारी 2025 रोजी त्याची प्रत्यक्ष शिक्षा 19 वर्षे, तीन महिने आणि 20 दिवसांची असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
महाराष्ट्र तुरुंग नियमावलीनुसार, सालेमच्या अकाली सुटकेचा प्रस्ताव सल्लागार मंडळ आणि कनिष्ठ न्यायालयाच्या मंजुरीसाठी राज्य सरकारकडे सादर करण्यात आला आहे. अशी माहिती अतिरिक्त पोलिस महासंचालक आणि तुरुंग महानिरीक्षक सुहास वारके यांनी दाखल केलेल्या दुसऱ्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. अर्जदार सालेमची ( Abu Salem Verdict ) गुन्हेगारीचा इतिहास हा अजिबात स्वीकारार्ह नाही. त्याने भारतात अनेक गुन्हे केल्यानंतर तो परदेशात फरार झाल्याचेही वारके यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. तसेच सालेमला दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
सालेमने मार्च 2025 पर्यंत 19 वर्षे तुरुंगवास भोगला आहे. त्यामुळे 25 वर्षांचा कालावधी आजपर्यंत पूर्ण झालेला नाही. सालेमची कारावासातील 25 वर्षे पूर्ण होण्याची अंतिम तारीख महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाकडून त्याच्या मुदतपूर्व सुटकेबाबत निर्णय घेतल्यानंतरच ठरवली जाईल, असेही प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. तसेच, सालेमची शिक्षा माफ करण्याचा आणि मुदतपूर्व सुटका करण्याचा प्रस्ताव प्रलंबित आहे. त्यावर लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी माहितीही सरकारच्या वतीने न्यायालयाला देण्यात आली आहे.