पारशिवनी : ( Navdurga Temple Parshivani ) मागील 83 वर्षांपासून अखंडपणे सुरू आहे, पिपरी येथील नवदुर्गा मंदिरातून नवरात्रोत्सवाच्या काळात निघणारी कलश यात्रा. मातीच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेपासून सुरू झालेला हा धार्मिक उत्सव एका भव्य जागृत मंदिराचे रूप घेत पिपरी-कन्हान परिसरातील श्रद्धेचे प्रमुख प्रतीक बनले आहे. राजा भोसले यांनी नवदुर्गा मंदिर उभारण्यासाठी जमीन दान केली. त्यामुळे पिपरीमध्ये भव्य मंदिराचे निर्माण झाले. या मंदिराच्या उभारणीत कोणताही शासकीय निधी वापरला गेला नाही. हे मंदिर पिपरी येथे मुख्य चौकात आहे. या मंदिरात विराजमान दुर्गा मातेची मूर्ती जोधपूर येथून आणण्यात आली आहे.
पारशिवनी तालुक्यात कन्हान नगर परिषद हद्दीत पिपरी वसाहतीचा इतिहास हा कन्हानपेक्षाही जुना आहे. पिपरी वस्ती स्थापन झाल्यानंतर येथील स्थानिक नागरिकांच्या प्रयत्नातून 1943 वडाच्या झाडाखाली पंडाल उभारून दुर्गा मातेच्या मातीच्या मूर्ती 9 दिवसांसाठी स्थापन करण्याची परंपरा सुरू झाली केली, ती आजतयागत सुरू आहे. प्रारंभी लहान स्वरूपात कलश यात्रा देखील सुरू झाली होती. तर मागील 10 वर्षे पासून या यात्रेद्वारे कन्हान नदीपात्रातीलन जल आणून देवीचे चरण धुणे व इतर धार्मिक विधी पार पाडण्याची परंपरा सुरु आहे. मंदिराची ( Navdurga Temple Parshivani ) स्थापना झाल्यानंतर नवरात्र, दसरा, दीपावली, रामनवमी अशा विविध सण-उत्सवांदरम्यान विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जाऊ लागले. येथे केलेल्या नवसांची पूर्ती बघता कालांतराने या मंदिराला ‘सिद्ध माता मंदिर’ म्हणून ख्याती मिळाली.
कावड यात्रेचे विशेष आकर्षण
नवरात्रोत्सवाच्या काळात पिपरी येथील नवदुर्गा मंदिरातून ( Navdurga Temple Parshivani ) निघणारी भव्य कलश यात्रा खूपच भक्तिभावाने आणि उत्साहाने काढली जाते. या यात्रेत नवदुर्गेच्या सर्व नऊ रूपांच्या आकर्षक झांक्यांचा समावेश असतो. कलश यात्रेची लोकप्रियता इतकी आहे की, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 काही काळासाठी पूर्णपणे ठप्प होत असतो. या पावन यात्रेत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी सुद्धा परिसरातील नागरिकांसोबत मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. पारंपरिक भारतीय पोशाखात सुसज्ज युवती आणि महिलांच्या डोक्यावर पाण्याने भरलेले कलश तर पुरुषांच्या खांद्यावर कावड असे दृश्य पाहायला मिळते.
नव्या परंपरेची सुरुवात
भव्य आणि जागृत नवदुर्गा मंदिरात ( Navdurga Temple Parshivani ) चैत्र नवरात्र उत्सवाच्या पावन पर्वावर घटस्थापनेची परंपरा मोठ्या भक्तिभावाने पार पडत असते. दरवर्षी येथे महाशिवरात्र आणि नवरात्र या दोन प्रमुख सणांच्या वेळी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. या प्रसादात कन्हान, पिपरी, पटेल नगर, कांद्री व परिसरातील हजारो नागरिक सहभागी होतात. याच दरम्यान नऊ दिवस विविध धार्मिक व सामाजिक जागृतीचे कार्यक्रम मंदिर समितीच्यावतीने आयोजित केले जातात. मंदिरात बाबा भोलेनाथांचा शिवलिंगही प्रतिष्ठापित करण्यात आले आहे. अलीकडील काळात मंदिर समितीने मंदिर प्रांगणात रावण दहनाची परंपरा देखील सुरू केली आहे. या रावण दहन कार्यक्रमाबाबत नागरिकांमध्ये विशेष उत्साह आणि सहभाग दिसून येतो.