नागपूर : ( Municipal Election ) महापालिकेची मुदत 4 मार्च 2022 रोजी संपुष्टात आली होती. तेव्हापासून महापालिकेत प्रशासक राज सुरू असून वेळोवेळी निवडणुकीच्या चर्चांना पेव फुटले. गेल्या काही दिवसांपासून महापालिका निवडणुकीची चर्चा रंगली होती. परंतु, याबाबत राज्य सरकार कधी आदेश काढणार हे गुलदस्त्यात होते. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अखेर नगर विकास विभागाने प्रभाग रचनेचे प्रारुप तयार करण्याचे आदेश आयुक्तांना दिले. दरम्यान, शहरात 2017 प्रमाणे चार सदस्यीय प्रभाग पद्धती राहणार असल्याचे आदेशातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता वाढीव लोकसंख्या, त्यानुसार आरक्षण व प्रभागाचे सिमांकन करण्याचे आव्हान आयुक्तांपुढे ( Municipal Election ) राहणार आहे.
आता नगर विकासाने आदेश निघाल्यानंतर चर्चांना पूर्ण विराम ( Municipal Election ) मिळाला. रात्री उशिरापर्यंत नगर विकास विभागाचे आदेश महापालिकेत पोहोचले. त्यामुळे महापालिकेचे अनेक अधिकारी अनभिज्ञ होते. परंतु, त्यापेक्षाही शहरातील विविध पक्षाचे कार्यकर्ते व माजी नगरसेवकांमध्ये हे आदेश पोहोचल्याने परिचितांमध्ये चर्चेला पेव फुटले. आदेश निघाल्याने दिवाळीनंतर निवडणूक नक्की होणार. याबाबत माजी नगरसेवकांना खात्री झाल्याने त्यांच्यातही उत्साह दिसून आला. शक्यतोवर प्रभाग चार सदस्यांचे करायचे आहे.
सर्वच प्रभाग चार सदस्यीय होत नसल्यास शेवटचा प्रभाग तीन किंवा पाच सदस्यांचा करण्याचा आदेश ( Municipal Election ) आहेत. त्यामुळे शहरात चार सदस्यीय प्रभाग पद्धती राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रत्येक प्रभागातील संख्येनुसार अ, ब, क, ड अशी पद्धत राहणार आहे. पाच सदस्यांचा प्रभाग झाल्यास अ, ब, क, ड, ई व तीन सदस्यांचा प्रभाग झाल्यास अ, ब, क अशी पद्धत राहणार आहे. आदेशात सिमांकन, लोकसंख्या आदीचा विचार करून प्रभाग रचना करण्याचे स्पष्ट आहे.
प्रभाग रचनेची सुरुवात उत्तरेतून
मुंबई वगळता इतर महापालिकांमध्ये तीन सदस्यीय प्रभागरचनेचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला ( Municipal Election ) होता. परंतु, त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या सरकारने 2017 च्या प्रभागरचनेनुसार महापालिका निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला होता. प्रभागाची रचना करताना उत्तरेकडून सुरुवात करण्याचे आदेशात नमुद करण्यात आले आहे. उत्तरेकडून उत्तर-पूर्व त्यानंतर पूर्वेकडून पश्चिमेकडे पुढे जात शेवट दक्षिणेत करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रभाग क्रमांकाची सुरुवात उत्तरेकडून करण्यात येईल. त्यामुळे नागपुरातील प्रभागरचना 2017 प्रमाणेच राहण्याची शक्यता आहे. यात किरकोळ बदल होण्याची शक्यता आहे. नागपुरात 2017 च्या निवडणुकीत 38 प्रभाग होते तर, 151 नगरसेवक होते. 37 प्रभाग चार सदस्यीय होते तर प्रभाग क्रमांक 38 हा तीन सदस्यांचा होता. 2017 मध्ये अनुसूचित जातीसाठी 30, अनुसूचित जमातीसाठी 12, मागास प्रवर्गासाठी 42 तर खुल्या प्रवर्गातील 68 जागा होत्या. यात 50 टक्के जागा महिलांसाठी आरक्षित होत्या. यावेळी लोकसंख्येनुसार काही प्रमाणात आरक्षणात बदल होण्याची शक्यता आहे.