Ahmedabad Crash Escape : अहमदाबादेत थोडक्यात बचावला नागपूरचा डॉ. सुशांत देशमुख

Top Trending News    14-Jun-2025
Total Views |
 
dr
 
नागपूर - ( Ahmedabad Crash Escape ) अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या ए. आय. 171 (बोईंग 787 ड्रिमलायनर) या प्रवासी विमानाला बुधवारी झालेल्या दुर्दैवी अपघातात 241 लोकांचा मृत्यू झाला. बी. जे. मेडिकल कॉलेजच्या वसतीगृहावर हे विमान धडकले. या वसतीगृहात नागपूर येथील डॉ. सुशांत देशमुख हा रहात होता. मात्र, सुदैवाने त्याची ट्रॉमात ड्युटी लागलेली होती. त्यामुळे घटनेच्या वेळी तो नेमका वसतिगृहात नव्हता. त्यामुळे, डॉ. सुशांत थोडक्यात बचावला. पण दुर्दैवाने तो रहात असलेली खोली आणि त्यातले साहित्य, पुस्तके आगीत भस्मसात झाली.
 
डॉ. सुशांत देशमुख हा नागपुरातील स्त्रीरोग, प्रसुतीशास्त्र तज्ज्ञ डॉ. सुषमा देशमुख आणि डॉ. सुधीर देशमुख यांचा थोरला मुलगा आहे. डॉ. सुशांत हा अहमदाबाद येथील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये विशेषोपचार शाखेत पदव्युत्तर अभ्यसक्रमाचा अंतिम वर्षाचा विद्यार्थी आहे. एअर इंडियाच्या विमानाला बुधवारी ज्या दिवशी आणि ज्या क्षणी अपघात झाला त्या वेळी डॉ. सुशांत हा मेडिकल कॉलेजच्या ट्रॉमा सेंटरमध्ये कर्तव्यावर तैनात होता. तेव्हा पासून म्हणजे जवळ जवळ 24 तासांपासून तो आताही ट्रॉमामध्येच रुग्ण सेवा ( Ahmedabad Crash Escape ) देत आहे.
 
डॉ. सुशांत हा मेडिकलचा विद्यार्थी
 
बी. जे. मेडिकल कॉलेजशी संलग्न सुपर स्पेशालिटी विभाग हा गुजरात कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट सेंटर (जी.सी.आर.आय.)शी देखील संलग्न आहे. कर्करोग शल्यचिकित्सा शाखेतील हा सुपर स्पेशालिटी विभाग देशातील 3 सर्वोच्च कॅन्सर शल्यक्रिया संस्थांपैकी एक आहे. जानेवारी 2023 या वर्षी या विभागात प्रवेश मिळविलेला डॉ. सुशांत हा देशातून निवडल्या गेलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी 26 वा आणि महाराष्ट्रातील एकमेव विद्यार्थी आहे. नागपुरातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून मेडिकलमधून पदवी शिक्षण घेतलेल्या डॉ. सुशांतने मीरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून शल्यक्रियेत एम. एस. शिक्षण घेतले. त्यानंतर कर्करोग सुपर स्पेशालिटी शाखेत एम. सी. एच. करण्यासाठी तो अहमदाबादेत गेला आहे. सध्या तो रहात असलेल्या वसतीगृहावर विमान धडकल्याच्या घटनेनंतर अवघ्या काही मिनिटांतच पोलिस आणि सशस्त्र दलाने बी. जे. मेडिकल कॉलेजच्या ( Ahmedabad Crash Escape ) वसतीगृहाचा परिसर सील केला आहे.