Anil Deshmukh : स्थानिक निवडणुका धोक्यात ? अनिल देशमुख यांचा मोठा गौप्यस्फोट

Top Trending News    15-Jun-2025
Total Views |

anil
नागपूर : ( Anil Deshmukh ) राज्यात महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. प्रभाग रचनेची तयारीही सुरू झाली. शिवाय, महायुती व मविआतील आघाडीच्या चर्चांनीही वेग घेतला. असे असतानाही माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) यांना या निवडणूका होतील यात शंका आहे. 'भाजपचेच लोक कोर्टात जातात. निवडणुकीवर स्थगिती आणतात. प्रभाग रचना झाल्यावरही निवडणूक स्थगित होऊ शकते. त्यामुळे प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर झाला असला तरी निवडणूक होईलच' अशी शक्यता काय ? अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे. ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.
देशमुख ( Anil Deshmukh ) म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका झाल्या तर आनंदच होईल. या निवडणूकांसाठी राष्ट्रवादी महाविकास आघाडीसोबत समन्वय साधून आहे. गेल्या निवडणूकीत ऐनवेळेवर काँग्रेसने दगा दिला होता. शेवटच्या क्षणापर्यंत आघाडीबाबत चर्चा करून जागेवरून अडचण केली. त्यामुळे अंतीम क्षणी पक्षाला शंभरावर उमेदवार शोधण्यासाठी धावाधाव करावी लागली. या निवडणूकीतही तडजोड करण्याची पक्षाची तयारी आहे. चर्चा जशा पुढे जातील, त्यापध्दतीने निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. 2017 च्या निवडणूकीत जो गोंधळ झाला तो होऊ नये, अशी अपेक्षा आहे. त्या निवडणूकीत राष्ट्रवादीचा केवळ एकच उमेदवार निवडून आला होता. सर्वच पक्ष आपले अस्तित्व टिकविण्यासाठी व पक्षवाढीसाठी काम करतात. त्यामुळे सर्वांना त्यांच्या भूमिका व मत प्रदर्शन करण्याचा अधिकार असल्याचेही देशमुख म्हणाले.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्वखुशीने पद सोडण्याची इच्छा बोलून दाखविली. परंतु, आगामी काळातील या निवडणूका बघता त्यांच्याकडेच धुरा राहील. पक्षाचे नेतृत्व युवा नेतृत्वाला सोपविले जाणार असल्याचे संकेत शरद पवार यांनी दिले. त्यामुळे ते जो निर्णय घेतील वा त्यांनी ठरविला तो मान्य असेल.
सातबारा कोरा करा
प्रहारचे बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पक्षाचा पाठिंबा आहे. विधानसभा निवडणूकीवेळी फडणवीस यांनी प्रत्येक उमेदवाराच्या प्रचारावेळी सातबारा कोरा करू, असे आश्वासन दिले होते. सरकार येऊन 7 महिने झाले. आता ते मुख्यमंत्री आहेत. त्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करावे. उपमुख्यमंत्रीद्वय अजीत पवार, एकनाथ शिंदे यांना यासाठी विचारण्याची गरज नाही, असेही देशमुख म्हणाले.