तिरुवनंतपुरम : ( Emergency Landing ) गुजरातमधील विमान अपघातामुळे आता सर्वत्र भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे. इतक्यातच पुन्हा एकदा लढाऊ विमानाची इमर्जन्सी लँडिंग झाल्याची माहिती पुढे आली आहे. हे लढाऊ विमान शनिवारी रात्री हिंदी महासागरावरून उड्डाण करत होते. ब्रिटिश एफ-35 या लढाऊ विमानाने विमानवाहू जहाजावरून उड्डाण केले होते असे सांगितले जात आहे. तिरुवनंतपुरम येथे अचानक या विमानाच्या वैमानिकाने इमर्जन्सी लँडिंगची परवानगी मागितली.
केरळच्या तिरुअनंतपुरम मधील आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका ब्रिटिश लढाऊ विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले आहे. ब्रिटिश नौदलाच्या एफ-35 या लढाऊ विमानातील इंधन संपले होते. या ब्रिटिश लढाऊ विमानात इंधनाचा साठा कमी असल्याचे कारण देत विमानाने तत्काळ लँडिंगची परवानगी मागितली होती. परवानगी देण्यात आल्यानंतर या विमानाचे तत्काळ लँडिंग करण्यात आले. वृत्तानुसार, सुरक्षित लँडिंग सुनिश्चित करण्यासाठी विमानतळ अधिकाऱ्यांनी आपत्कालीन परिस्थिती जाहीर केली. तर त्या विमानातील वैमानिकाने कमी इंधन असल्याचे कारण सांगितले, आणि लँडिंगची परवानगी मागितली. त्यानंतर तात्काळ आणि सुरक्षितरित्या विमानाचे लँडिंग करण्यात ( Emergency Landing ) आले.
दरम्यान, ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने अद्याप या आपत्कालीन लँडिंग विषयी कोणतेही निवेदन जारी केले नसल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. सध्या हे लढाऊ विमान तिरुवनंतपुरम विमानतळावर उभे आहे. हे विमान विमानतळावर पार्क करण्यात आले असून केंद्र सरकारमधील संबंधित अधिकाऱ्यांकडून मंजुरी मिळाल्यानंतर इंधन भरल्यानंतर हे विमान उड्डाण करणार असल्याचे माहिती सूत्रांकडून मिळते आहे.