कोल्हापूर - ( Black Magic ) कोल्हापूर जिल्ह्यातील उदगाव येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत काही व्यक्तींनी भरदिवसा नग्न अवस्थेत करणी व भानामतीचे अघोरी प्रकार केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकाराचे सीसीटीव्ही फुटेज स्थानिक ग्रामपंचायतीकडे उपलब्ध झाले असून, त्यामध्ये एक महिला आणि एक पुरुष वेगवेगळ्या वेळेस अशा प्रकारचे अघोरी कृत्य करताना स्पष्ट दिसत आहेत.
जयसिंगपूर येथील एका वृद्धाचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर उदगावमधील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. काही दिवसांनंतर रक्षा विसर्जनासाठी जेव्हा नातेवाईक पुन्हा तेथे गेले, तेव्हा त्यांना अंत्यसंस्काराच्या ठिकाणी संशयास्पद वस्तू आढळल्या. चितेच्या राखेच्या खाली काळी बाहुली, नारळ, आणि नाव लिहिलेली चिठ्ठी ठेवलेली होती. या प्रकारानंतर नातेवाईकांनी सीसीटीव्ही फुटेजची मागणी ( Black Magic ) केली.
सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर महिला आणि पुरुषाकडून नग्न होऊन करणी, भानामतीचा प्रकार सुरू असल्याचे समोर आले. मात्र, पुरुष आणि महिला वेगवेगळ्या वेळी वैकुंठधाममध्ये आल्याचे दिसून आले. अमावस्या, पौर्णिमा, शनिवार आणि बुधवार या दिवशी हे अघोरी प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर आता उदगाव ग्रामपंचायतकडून असे प्रकार रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात येणार आहेत.