Marathi Pride : मराठीची बोलू कौतुके…. अमेरिकेतील मराठी दाम्पत्याने मुलाला टाकले झेडपी शाळेत

Top Trending News    20-Jun-2025
Total Views |

zpschool 
 सांगली - ( Marathi Pride )  मूळचे मराठी, परंतु अमेरिकेत स्थायिक एका दाम्पत्याने आपल्या 7 वर्षांच्या मुलाला सांगली जिल्ह्यातील आटपाडी जिल्हा परिषद शाळेत घातले आहे. मुलाची आणि मराठी भाषेची नाळ तुटू नये, म्हणून दाम्पत्याने हा निर्णय घेतला. भारती आणि विजयकुमार शेळके हे महाराष्ट्रातले असून, दोघेही कामानिमित्त अमेरिकेत स्थायिक आहेत.
 
विहान नावाचा त्यांचा 7 वर्षांचा मुलगा अमेरिकेच्या उत्तर कॅरोलिनातील शाळेत शिकत होता. सुरुवातीला तो चांगले मराठी बोलत असे. पण शाळेतले मित्र अमेरिकी असून, तो इंग्रजी बोलायला लागला आणि मराठी भाषा विसरत होता. भारती यांना ही धोक्याची घंटा वाटली. विहान पुढे मराठी पूर्णपणे विसरून जाईल, अशी भिती त्यांना होती. त्यांचे भाऊ डॉ. उमेश बालटे सांगलीत राहतात. त्यांचाही मुलगा आटपाडीच्या शाळेत शिकतो. त्यामुळे भारती यांनी विहानला आटपाडीच्या जि.प. शाळेत पाठवले.
 
विहान आता मामेभावासोबत शाळेत जाऊन मराठीचे धडे गिरवणार आहे. शेळके दाम्पत्याला दोन मुले असून, दुसरा दोन वर्षांचा आहे. पुढच्या दीड वर्षात शेळके यांचा व्हिसा संपणार आहे. त्यामुळे तोपर्यंत विहान चांगले मराठी शिकेल अशी भारती ( Marathi Pride ) यांना आशा आहे.