Power Collapse : अवकाळी पावसाचा वीज व्यवस्थेवर घाला ! महावितरणला 9 कोटींचा झटका

Top Trending News    24-Jun-2025
Total Views |

collaps
 
नागपूर : ( Power Collapse ) जिल्ह्याला अवकाळी पावसाने मे आणि जून महिन्यामध्ये महावितरणला तब्बल 9 कोटी 6 लाखांचा फटका बसला आहे. वादळी वाऱ्यांसह आलेल्या पावसाने जिल्ह्याची वीज वितरण यंत्रणा अक्षरशः कोलमडून पडली होती. आतापर्यंत 562 उच्चदाब आणि 2,344 लघुदाब विद्युत खांबांचे नुकसान झाले आहे. याशिवाय, 38.33 किलोमीटर उच्चदाब उपरी वीज वाहिन्या आणि 205.01 किलोमीटर लांबीच्या लघुदाब वीज वाहिन्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
 
जागोजागी उन्मळून पडलेली झाडे, तुटलेल्या तारा आणि वाकलेले खांब, सखल भागात साचलेले पाणी यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र, या कठीण परिस्थितीतही महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अहोरात्र कष्ट करत वीजपुरवठा पूर्ववत करण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे. जिल्ह्यातील 4 वितरण पेट्या आणि 9 वितरण पॉईंट्स कोसळले असून, 185 वितरण रोहित्रांना (ट्रान्सफॉर्मर) हानी पोहोचली आहे. तसेच, 5 ठिकाणी सिंगल फेज वीज मीटर आणि 2 उपकेंद्रांतील उपकरणांचेही नुकसान झाले आहे. एकूण 150 मीटर उच्चदाब आणि 80 मीटर लघुदाब वाहिन्यांचेही प्रचंड नुकसान झाले असून, यामुळे महावितरणला अंदाजे 9 कोटी 6 लाखांवरचा आर्थिक फटका बसला ( Power Collapse ) आहे.
 
या नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला होता. यामुळे केवळ सामान्य नागरिकच नव्हे, तर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनाही मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले. कोसळलेली वितरण यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. अंधारात अडकलेल्या गावांमध्ये आणि शहरांमध्ये वीज पोहोचवण्यासाठी त्यांनी पावसात आणि वादळातही ( Power Collapse ) न थांबता काम केले.