यवतमाळ : ( Shakuntala Railway ) दारव्हा (यवतमाळ) - मूर्तिजापूर-अचलपूर रेल्वेमार्गाच्या ब्रॉडगेज परिवर्तनाला मंजुरी मिळण्यासाठी शकुंतला रेल्वे विकास समिती सातत्याने पाठपुरावा करत आहे. परंतु, मालकी हक्काशी संबंधित काही तांत्रिक अडचणींमुळे प्रकल्प रखडला आहे. शकुंतला रेल्वेमार्ग हा खासगी कंपनीच्या मालकीचा असल्याने रेल्वे मंत्रालयाने तो ताब्यात घेऊन ब्रॉडगेजमध्ये परिवर्तित करणे आवश्यक आहे. २३ मे रोजी नागपूर येथे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत लोकप्रतिनिधींची बैठक झाली. त्यात सुद्धा ब्रॉडगेजच्या डीपीआरवर चर्चा झाली आहे. या समस्येच्या निराकरणासाठी आणि प्रकल्पाला गती देण्यासाठी शकुंतला रेल्वे विकास समितीने मुख्यमंत्र्यांकडे हस्तक्षेपाची विनंती केली आहे. या प्रकल्पाचा ( Shakuntala Railway ) सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) अद्यापही प्रलंबित आहे.
२०१७ च्या पिंक बुकनुसार, गेज परिवर्तन प्रकल्पासाठी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट प्रोग्राम जाहीर करण्यात आला होता. याशिवाय, फेब्रुवारी २०२४ मध्ये राज्य शासनाने ५०% कॉस्ट शेअरिंगची तरतूद अर्थसंकल्पात केली होती. पश्चिम विदर्भाच्या विकासाचा केंद्रबिंदू असलेला हा रेल्वेमार्ग वर्धा-नांदेड प्रकल्पाला जोडणारा असल्याने त्याला विशेष महत्त्व आहे. शकुंतला रेल्वे विकास समितीने मालकीहक्काच्या समस्येचे तातडीने निराकरण करून भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी केली आहे. परंतु, मालकीहक्काशी संबंधित अडचणी आणि काही ठिकाणी भूसंपादनाची गरज यामुळे प्रकल्प रखडला आहे. अनेक दशकांपासून शकुंतलेच्या समस्येवर तोडगा निघाला नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण होत आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून प्रकल्पाला गती द्यावी, अशी विनंती समितीने केली आहे.
शकुंतला रेल्वेमार्गाच्या ( Shakuntala Railway ) ब्रॉडगेज परिवर्तनासाठी तांत्रिक अडचणी आणि भूसंपादनाचे प्रश्न तातडीने सोडवून प्रकल्प मार्गी लावण्यासाठी केंद्र शासनाने ऑपरेशन 'शकुंतला' हाती घ्यावे, अशी शकुंतला रेल्वे विकास समितीची मागणी आहे.
- अक्षय पांडे, समन्वयक, शकुंतला रेल्वे विकास समिती