दिल्ली : ( Waziristan Attack ) शनिवारी पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात एक आत्मघाती हल्ला झाला. या हल्ल्यात किमान 13 सुरक्षा दलाचे जवान मारले गेले. अशी माहिती पाक लष्कराच्या मीडिया युनिटने दिली. इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सने एका निवेदनात म्हटले आहे की, दहशतवाद्यांनी एक सुनियोजित आणि भ्याड हल्ला केला. ज्यामध्ये त्यांनी उत्तर आयएसपीआरला लक्ष्य केले. शनिवारी सकाळी खड्डी गावात एका आत्मघातकी हल्लेखोराने स्फोटकांनी भरलेले वाहन बॉम्ब निकामी करणाऱ्या युनिटच्या माइन-रेझिस्टंट अॅम्बुश प्रोटेक्टेड वाहनावर धडकवले. या हल्ल्यात महिला आणि मुलांसह 14 नागरिक जखमी झाले आहेत. त्यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील वझिरीस्तान भागात ( Waziristan Attack ) झालेल्या आत्मघातकी हल्ल्यासाठी पाकिस्तानने भारताला जबाबदार धरले आहे. मात्र, पाकच्या या आरोपावर भारताने खडे बोल सुनावले आहेत. भारताने पाकिस्तानच्या प्रयत्नांना स्पष्टपणे नकार दिला. या हल्ल्यात किमान 13 पाकिस्तानी लष्कराचे जवान मारले गेले आणि 24 जण जखमी झाले. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे स्पष्ट म्हणणे आहे की, आम्ही पाकिस्तानी लष्कराचे अधिकृत विधान पाहिले आहे. ज्यामध्ये 28 जून रोजी वझिरीस्तानमध्ये झालेल्या हल्ल्यासाठी भारताला जबाबदार धरण्यात आले आहे. आम्ही हे घृणास्पद विधान पूर्णपणे नाकारतो. लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्तानचा हा प्रयत्न आहे, असे म्हणत पाकच्या आरोपांना भारताने फेटाळून लावले आहे.