नागपूर : ( PMAY Scam ) पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत (PMAY) मंजूर करण्यात आलेल्या ऑरेंज सिटी पार्क गृहनिर्माण योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार, फसवणूक व नियमभंग उघडकीस आल्याने एकाच खळबळ उडाली आहे. पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांनी या घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे. कित्येक नागरिकांनी आपल्या आयुष्यभराच्या जमापुंजीतून या योजनेतील व्हिला आणि फ्लॅट्स खरेदी केले आहेत. या पार्श्वभूमीवर, गृहनिर्माण विभागाने संपूर्ण योजनेचा तातडीने ताबा घ्याव. तसेच संबंधित म्हाडा अधिकाऱ्यांसह बिल्डरविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवावा, अशी मागणी आमदार विकास ठाकरे केली आहे.
मुंबई आणि नागपूर येथील म्हाडा अधिकाऱ्यांनी फसवणुकीच्या क्लृप्त्या करून गंभीर नियमभंग केला. आणि लेआउट व इमारत नकाशांना मंजुरी दिली. तसेच बिल्डरला पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अनुदानाचा लाभ मिळवून देण्यास मदत ( PMAY Scam ) केली. नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणात चौकशीसाठी गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोंयार यांना अधिकृत निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर म्हाडाने मिलेनियम डेव्हलपर्स अँड प्रमोटर्स प्रा. लि. या बिल्डरला व्हिला व फ्लॅट विक्री तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले आहेत. ही योजना वानाडोंगरी (हिंगणा) भागात आहे.
असा केला नियमभंग
वानाडोंगरी २०१६ पासून नगरपरिषद आहे. त्या भागावर प्रादेशिक योजना (Regional Plan) लागू आहे. मात्र, म्हाडाने या लेआउटच्या मंजुरीसाठी नागपूर महानगर प्राधिकरणाचा (NMRDA) विकास आराखडा (Development Plan) विचारात घेतला. प्रादेशिक योजनेत सदर लेआउटपर्यंत कोणताही रस्ता नाही. त्यामुळेच म्हाडाने २०२१ मध्ये या लेआउटला मंजुरी देताना NMRDA च्या मसुद्यातील प्रस्तावित रस्त्याचा आधार घेतला. लेआउट मंजुरीसाठी मुख्य रस्ता असणे बंधनकारक असूनही ते न बंधात बनावटपणे रस्ता दाखवला विशेष म्हणजे ज्या जागेवर १८ मीटर रुंद रस्ता दर्शवण्यात आला आहे ती जमीन बिल्डरच्या मालकीची ( PMAY Scam ) नाही. तरी देखील म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी सदर लेआउट व इमारत नकाशाला बिनधास्त मंजुरी दिली.
वानाडोंगरी नगरपरिषदेची मंजुरी न घेता व प्रत्यक्ष रस्ता तयार नसताना, म्हाडाने बांधकामाला प्लिंथ सर्टिफिकेट दिली. फायर NOC नसतानाही अनेक ८ मजली इमारतींच्या नकाशांना बिनधास्त मंजुरी ( PMAY Scam ) देण्यात आली. ऑक्युपन्सी सर्टिफिकेट, स्ट्रक्चरल व फायर सेफ्टी मंजुरी न घेता काही व्हिला ताब्यात देण्यात आले. काही नागरिक आता तेथे वास्तव्यास आहेत. सीवेज डिस्पोजल यंत्रणा, मालमत्ता कर मूल्यांकन, तसेच वानाडोंगरी नगरपरिषदेची आवश्यक परवानगी न घेता संपूर्ण योजना उभारली. सांडपाणी शेजारील शेतीमध्ये सोडले जात आहे. पर्यावरण व नागरी नियमांची संपूर्ण धूळधाण उडविली आहे.
म्हाडा नागपूरचे अधिकारी महेशकुमार मेघमाळे यांनी मार्चमध्ये पाहणी करून खोटा अहवाल दिला.नियमभंग व अतिक्रमण झाकून बिल्डरच्या बाजूने हा अहवाल वळविला आहे. ऑक्युपन्सी नसतानाही नागरिक व्हिलामध्ये कसे राहत आहेत हाच मुख्य प्रश्न आहे. शेजारील शेती भूधारकांनी तक्रारी केली आहे कि, बिल्डरने त्यांच्या जमिनीवर बेकायदेशीर ताबा घेतला आहे. याबाबत नगरपरिषद, पोलिसांकडे लेखी तक्रारी देण्यात आल्या असून आता कारवाईची ( PMAY Scam ) वाट पहिली जात आहे.