बंगळुरू : ( RCB Victory Parade Stampede ) आयपीएलचे विजेता असलेल्या आरसीबीच्या विजय परेड पाहण्यासाठी बंगळुरूमध्ये लोकांचा मोठा जमाव जमला होता. आरसीबीच्या आयपीएल करंडक विजयी सेलिब्रेशनसाठी एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर तुफान गर्दी जमली होती. या गर्दीत चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता संघाच्या खेळाडूंची बस थेट हॉटेलवर रवाना करण्यात आली. या चेंगराचेंगरीत सात जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती मिळाली असून 50 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनेक लोकांच्या मृत्यूनंतर बंगळुरूमध्ये आरसीबीच्या परेडचा उत्सव शोकात बदलला होता. या अपघातामागे नेमकी चूक कुणाची यावर सर्वत्र चर्चा होत आहे.
भाजपा नेते अमित मालवीय यांनी एक्सवर लिहिले की, बंगळुरूमधील उत्सवाचे वातावरण एका भयानक स्वप्नात बदलले आहे. कर्नाटक सरकारच्या चुकीच्या नियोजन आणि गैरव्यवस्थापनामुळे ही चेंगराचेंगरी झाली आहे. मालवीय पुढे म्हणाले की, राज्य सरकारच्या मूलभूत प्रशासकीय दूरदृष्टीचा अभाव आणि गर्दी नियंत्रणात अपयश आले. आणि यामुळे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. लोकांचे प्राण योगायोगाने नव्हे तर निष्काळजीपणामुळे गेले आहे, असा आरोप त्यांनी ( RCB Victory Parade Stampede ) राज्य सरकारवर केला आहे.
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी मृत्युमुखी पडलेल्या लोकांचा आकडा सांगण्यास नकार दिला आहे. तर, त्यांनी या चेंगराचेंगरीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले, आम्ही मृत्यूबद्दल सध्या कसलीही पुष्टी करू शकत नाही. आम्ही 5,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची व्यवस्था केली होती. परंतु, तरुण उत्साही गर्दी खूप जास्त होती. आम्ही लाठीचार्ज करू शकत नव्हतो. तर, या अपघातामागे आयोजकांचा निष्काळजीपणा आणि गर्दी नियंत्रणातील त्रुटी ( RCB Victory Parade Stampede ) असल्याचा संशय आहे. पोलिस प्रशासन संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहे.
मिरवणुकीला परवानगी नाकारली
मिळालेल्या माहितीनुसार, विराट कोहली आणि रजत पाटीदार यांच्या नेतृत्त्वाखालील आरसीबी संघाची विजयी मिरवणूक काढण्याची प्रशासनाची योजना होता. परंतु, संभाव्य गर्दी पाहता परवानगी नाकारण्यात आली. त्यानंतर विजयी परेड रद्द करत चिन्नास्वामी स्टेडियमवर सत्कार सोहळा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तर स्टेडियमवर चाहत्यांना मोफत प्रवेश दिला जाणार होता. विजयी परेड रद्द झाल्याने चाहत्यांनी थेट स्टेडियमबाहेर गर्दी ( RCB Victory Parade Stampede ) केली. चिन्नास्वामी स्टेडियमची आसन क्षमता 30 ते 32 हजार इतकीचा आहे. पण स्टेडियमबाहेर लाखोंची गर्दी उभी होती. या गर्दीला आवरणं सुरक्षारक्षकांनाही कठीण झाले. गर्दी इतकी होती की चक्क स्टेडियम बाहेरील वाहनांवर लोक चढले.