नागपूर : ( Shalarth ID Scam ) शालार्थ आयडी घोटाळ्याने संपूर्ण शिक्षण विभागात खळबळ माजली आहे. अधिकाऱ्यांच्या अटकेमुळे शिक्षण विभागात भीतीचे वातावरण सुरु झाले आहे. अधिक चौकशी सुरू असून दुसरीकडे बऱ्याच अधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक झाली आहे. शिवाय कागदपत्रही ताब्यात घेतली आहेत. शालार्थ आयडी घोटाळ्या प्रकरणात नागपूर विभागातील बऱ्याच अधिकाऱ्यांना अटक झाली. त्यानंतर उपसंचालकासह, इतर लिपिक आणि अधिकाऱ्यांना सुद्धा अटक करण्यात आली.
चौकशी शिवाय अटक नाही
अटकसत्रामुळे नागपुरात कुणीही काम करण्यास तयार नाही. त्यामुळे शालेय शिक्षण विभागाचे आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंग यांनी बुधवारी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांची भेट घेतली. त्यांनतर, शिक्षण आयुक्त सिंग, प्राथमिक विभागाचे संचालक गोसावी यांनी सुद्धा पोलिस आयुक्तांची भेट घेतली. तसेच, शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांनीही पोलिस आयुक्तांना याबाबत फोन केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. चौकशी केल्याशिवाय अटकेची कारवाई करू नये, अशी सूचना त्यांनी केली असून पोलीस आयुक्तांकडून सुद्धा सहमती दर्शविण्यात आल्याचे सूत्रांकडून ( Shalarth ID Scam ) समजले आहे.
बैठकीत पोलिस आयुक्तांनी एसआयटीमार्फत करण्यात येत असलेल्या कारवाईबाबत माहिती दिली. दरम्यान शिक्षण विभागाकडूनही करण्यात येत असलेल्या चौकशीचा आढावा पोलिसांना देण्यात आला. चौकशीसाठी पोलिसांकडील काही कागदपत्रांची गरज असणार असून ते देण्यावरही एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. चौकशी समितीला बोगस शिक्षक बाबतचा अहवाल सादर करायचा आहे. पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी अहवाल द्यायचा आहे. त्यामुळे चौकशी केल्यावरच अधिकाऱ्यांना अटकेची कारवाई ( Shalarth ID Scam ) करावी, कागदपत्र देण्यात यावे, याबाबतचे अधिकृत पत्रच प्रधान सचिवांकडून पोलिसांना देण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.