मुंबई - ( Sanjay Raut ) सुधाकर बडगुजर यांच्यावर काल केलेल्या पक्षातून हकालपट्टीच्या कारवाईनंतर संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राऊत म्हणाले, शिवसेनेतील आऊटगोईंग वगैरे शब्द बंद करा. पैशाच्या जोरावर, दबावाखाली लोकांना पक्षांतर करायला भाग पाडणे याला आऊटगोईंग-इनकमिंग अशा शब्दांच्या उपमा देऊ नका. दोन तास आमच्याकडे ईडी, सीबीआय, पोलीस आले तर राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून भाजप 90 टक्के आऊटगोईंग करेल. याला वैचारिक पक्षांतर वगैरे म्हणणं पूर्णपणे चुकीचे ठरेल.
पक्षातून कोणाला जायचे, कोणाला थांबायचचे हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. पण पक्षात राहून जर कारवाया कराल तर तुमच्यावर कारवाई केली जाईल. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही कोणत्याही प्रकारचा दबाव आणि ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही. देशाच्या राजकारणातला हा बराच जुना पक्ष आहे. भले अमित शहांनी त्यांचा कांड शमवण्यासाठी, महाराष्ट्रावर त्यांना जो सूड उगवायचा आहे त्यासाठी शहांनी पक्ष फोडण्याचा प्रयत्न जरूर केला. पण शिवसेना काय आहे ते नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनाही समजेल असा इशाराही संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी दिला.
इनकमिंग-आऊटगोईंग किंवा अजून कोणतेही शब्द वापरत असाल तर त्या शब्दांचा वापर जपून करा, पक्षांतर्गत कोणतेही हेवेदावे, ब्लॅकमेलिंग, दबाव हे शिवसेना पक्षप्रमुख स्वीकारणार नाही, याचा पुनरुच्चार राऊतांनी ( Sanjay Raut ) केला. सुधाकर बडगुजर यांच्या हकालपट्टीनंतर शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दुसरा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून चार महत्त्वाच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यात नाशिक, जळगाव, जालना, रत्नागिरी-कोकणमधून चार उपनेत्यांची घोषणा करण्यात आली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संघटनात्मक बांधणीसाठी चार उपनेत्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. या नियुक्त्यांमध्ये गुलाबराव वाघ (जळगाव), सचिन घायाळ (जालना-पैठण), दत्ता गायकवाड (नाशिक), आणि सुरेंद्रनाथ (बाळ) माने (रत्नागिरी-कोकण) यांचा समावेश आहे. या संदर्भातील अधिकृत माहिती शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकातून देण्यात आली आहे. गुलाबराव वाघ यांना उपनेते पदाबरोबरच रावेर (लोकसभा मतदारसंघ) आणि नंदुरबार जिल्ह्याचे संपर्कप्रमुखपद ही अतिरिक्त जबाबदारीही देण्यात आली आहे.