आळंदी - ( Mauli Palkhi 2025 ) आषाढवारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे 19 जून रोजी प्रस्थान होणार आहे. दरवर्षी 4 वाजता सुरू होणारा पालखी सोहळा यंदा रात्री 8 वाजता सुरू होणार आहे. पालखी सोहळ्यास 4 तास उशीर होणार असल्याचे विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे आणि रोहिणी पवार यांनी सांगितले. पालखी प्रस्थान सोहळ्याच्या दिवशीच गुरुवार आला आहे. रोजच्या परिपाठानुसार दर गुरुवारी माऊलींची पालखी निघते. त्याला गुरुवार सोहळा म्हणतात. म्हणजेच 19 रोजी नितीनियमानुसारची गुरुवार सोहळ्याची पालखी निघेल. त्यानंतर आरती आणि मग पंढरपूर पालखी प्रस्थान सोहळा ( Mauli Palkhi 2025 ) सुरू होणार आहे.
15 अंध वारकऱ्यांची प्रथमच आषाढी दिंडी
हिंगोली : श्री विठ्ठल नामाच्या जयघोषात ( Mauli Palkhi 2025 ) 15 अंध वारकऱ्यांच्या दिंडीचे रविवारी हिंगोली येथून पंढरपूरकडे प्रस्थान झाले. 400 कि.मी. प्रवास करून ही दिंडी 6 जुलै रोजी पोहोचणार आहे. देशात प्रथमच निघालेली अंधांची दिंडी कौतुकाचा विषय ठरली आहे. वाशिम येथील संस्थेचे पदाधिकारी सदानंद तायडे यांनी अंध वारकऱ्यांच्या दिंडीचा उपक्रम हाती घेतला. त्यांच्या संस्थेत अंध वारकरी उच्चशिक्षित असून, अनेक ठिकाणी अभंग गायनाचे कार्यक्रम करतात. या वारकऱ्यांना वारीची ओढ होती. मात्र परिस्थितीवर कशी मात करावी, असा प्रश्न होता. यातून तायडे यांनी पुढाकार घेऊन दिंडी काढण्याचा निर्णय घेतला. हे वारकरी 1 जूनपासून निघाले आहेत. हिंगोली येथे रविवारी या वारकऱ्यांसाठी नाश्त्याची व्यवस्था होती.
दर्शन पासची 15 जूनला चाचणी
पंढरपूर - भाविकांना वेळेत आणि सुलभ दर्शन व्हावे, या साठी श्री विठ्ठल मंदिर समितीने ( Mauli Palkhi 2025 ) येत्या 15 जूनपासून टोकन दर्शन प्रणाली सुरू केली आहे. या सुविधेची मंदिरात तयारी सुरू असून, आषाढीपासून ही सुविधा कायमस्वरूपी राहणार आहे. प्रायोगिक तत्वावर चाचणी झाली आहे. मात्र टोकन दर्शनाची पहिली चाचणी 15 रोजी होणार आहे. चाचणी यशस्वी झाल्यास ही प्रणाली पुढे सुरू ठेवली जाईल, असे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.
श्री विठ्ठलाचे 27 पासून 24 तास दर्शन
पंढरपूर - आषाढी यात्रेचा सोहळा 6 जुलै रोजी साजरा होत आहे. या काळात जास्तीत भाविकांना विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेता यावे यासाठी 27 जूनपासून ते प्रक्षाळपूजेपर्यंत 24 तास दर्शन सुरू राहणार आहे. दरम्यान, तुळशी पूजा बंद करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी ही माहिती दिली.