नागपूर : ( Smart Meter Scam ) महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) ने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करत स्मार्ट मीटर ‘प्रीपेड’ नसल्याचे स्पष्टीकरण दिले. शिवाय नागरिकांकडून कोणतीही अतिरिक्त वसुली केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. विदर्भ वीज ग्राहक संघटनेच्या वतीने उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान महावितरणची बाजू मांडणारे अॅड. श्रीधर पुरोहीत यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले. न्यायमूर्तींद्वय नितीन सांबरे आणि महेंद्र नेरलीकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. या व्यतिरिक्त केंद्र सरकारची बाजू मांडणारे डेप्युटी सॉलिसिटर जनरल अॅड. देशपांडे यांनी प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी अवधी देण्याची विनंती केली. उच्च न्यायालयाने त्यांना दोन आठवड्यांचा अवधी देत 24 जुलै रोजी सुनावणी निश्चित ( Smart Meter Scam ) केली.
राज्यभर जबरदस्तीने बसवल्या जाणा-या स्मार्ट प्री-पेड वीज मीटरवर बंदी घालण्याची आणि ही पद्धत बेकायदेशीर घोषित करण्याची विनंती या याचिकेत ( Smart Meter Scam ) करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे न्यायालयाने याचिकाकर्त्याला प्री-पेड स्मार्ट विद्युत मीटर का असू नये याचे उत्तर सादर करण्यास सांगितले होते. आता महावितरणने आपली बाजू मांडली. या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, स्मार्ट मीटर लावताना ग्राहकांकडून कोणतीही अतिरिक्त रक्कम आकारली जाणार नाही. तसेच, महिन्याचे पैसे संपल्याबरोबर वीज तोडली जाईल, असा जो प्रचार केला जात आहे, तो पूर्णतः चुकीचा आहे. कायद्यानुसार, कनेक्शन बंद करण्यापूर्वी ग्राहकास नोटीस बजावली जाईल, असे महावितरणचे ( Smart Meter Scam ) म्हणणे आहे.
स्मार्ट मीटर केंद्राच्या सूचनेनुसार
राज्यात स्मार्ट मीटर लावण्यासाठी केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाची सूचना आणि पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडने मंजूर केलेली आरडीएसएस योजनेचा आधार असल्याचा स्पष्ट उल्लेख महावितरणने उच्च न्यायालयात केला आहे.
महावितरणचे दावे
-महाराष्ट्रासाठी सुमारे 25 हजार कोटींच्या निविदा मागवण्यात आल्या
- हा व्यवहार 2023 मध्येच पूर्ण झाला
- पुणे आणि मुंबईत 35 लाखांहून अधिक घरांमध्ये स्मार्ट मीटर बसविले
- सकाळी 9 ते सायंकाळी 5 दरम्यान ग्रीन एनर्जीच्या निर्मितीमुळे ग्राहकांना युनिट मागे 80 पैशांनी कमी दरात वीज
- स्मार्ट मीटरमुळे वीज चोरी सहज ओळखता येईल.
- वीज गळतीसही आळा बसेल
- ख-या वापरावर आधारित मोजमाप, कोणतीही अंदाजे बिलिंग नाही.