Mohan Bhagwat : भारतच संघाचा केंद्रबिंदू ! विश्वगुरू बनविण्याचा ध्यास - डॉ. मोहन भागवत

Top Trending News    27-Aug-2025
Total Views |

bhagwat
 
नवी दिल्ली : ( Mohan Bhagwat ) संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने आयोजित तीन दिवसांच्या व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत ( Mohan Bhagwat ) म्हणाले की, संघाची स्थापना भारताला केंद्रस्थानी ठेवून झाली आणि भारताला विश्वगुरू बनविण्यातच संघ स्थापनेची सार्थकता आहे. संघाच्या कार्याची प्रेरणा संघाच्या प्रार्थनेच्या शेवटी सांगितलेल्या "भारत माता की जय" मधून मिळते. संघाच्या उत्थानाची प्रक्रिया हळूवार आणि दीर्घ आहे, जी आजही निरंतर सुरू आहे. ते म्हणाले की, संघ हिंदू शब्दाचा उपयोग करीत असला तरी, त्याचे सार 'वसुधैव कुटुंबकम्' असेच आहे. संघ या क्रमिक विकासाअंतर्गत गाव, समाज आणि राष्ट्राला आपले मानतो. संघाचे कार्य पूर्णपणे स्वयंसेवकांद्वारे चालवले ( Mohan Bhagwat ) जाते. कार्यकर्ते स्वतः नवीन कार्यकर्ते तयार करतात.
 
दिल्लीतील विज्ञान भवन येथे '100 वर्ष की संघयात्रा - नए क्षितिज' या विषयावरील तीन दिवसीय व्याख्यानमालेचे पहिले पुष्प आज सरसंघचालकांनी गुंफले. यावेळी मंचावर संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाले, उत्तर क्षेत्र संघचालक पवन जिंदल आणि दिल्लीचे प्रांत संघचालक डॉ. अनिल अग्रवाल उपस्थित होते. या तीन दिवसांच्या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी, निवृत्त न्यायाधीश, माजी राजदूत, माजी प्रशासकीय अधिकारी, विविध देशांचे राजदूत, माध्यम संस्थांचे प्रमुख, माजी लष्करी अधिकारी आणि क्रीडा आणि कला क्षेत्राशी संबंधित व्यक्ती ( Mohan Bhagwat ) उपस्थित होत्या.
 
व्याख्यानमालेच्या उद्देशाबद्दल, डॉ. मोहन जी भागवत ( Mohan Bhagwat )  म्हणाले की, संघाबद्दलची खरी आणि योग्य माहिती समाजापर्यंत पोहोचावी, असे संघाचे मत होते. वर्ष २०१८ मध्येही असाच एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी संघाचे खरे स्वरूप जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे म्हणून चार ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जातील. ते म्हणाले की, राष्ट्राची व्याख्या सत्तेवर आधारित नाही. आपण गुलाम होतो, तेव्हाही एक राष्ट्र होते. इंग्रजीतील 'नेशन' हा शब्द 'स्टेट' या शब्दाशी जुळलेला आहे, तथापि, भारतातील राष्ट्र या संकल्पनेचा सत्तेशी संबंध नाही.
 
स्वातंत्र्यलढा आणि त्यानंतर देशात निर्माण झालेल्या विचारसरणीच्या विकासाबद्दल सरसंघचालक ( Mohan Bhagwat ) सांगतात की, १८५७ मध्ये स्वातंत्र्याचा पहिला प्रयत्न अयशस्वी झाला, परंतु त्यामुळे एक नवीन चेतना जागृत झाली. त्यानंतर मूठभर लोक आपल्याला कसे पराभूत करू शकतात ? असा विचार करणारी एक चळवळ उभी राहिली. यानंतर भारतीयांमध्ये राजकीय समज कमी आहे, असाही एक विचार उदयास आला. याच गरजेपोटी काँग्रेसचा उदय झाला, परंतु स्वातंत्र्यानंतर हा पक्ष वैचारिक प्रबोधनाचे काम योग्यरित्या करू शकला नाही. हा आरोप नसून, वस्तुस्थिती आहे. स्वातंत्र्यानंतर एका प्रवाहाने सामाजिक कुरीतींचे निर्मूलन करण्यावर भर दिला, तर दुसऱ्या प्रवाहाने आपल्या मूळ विचारांकडे परतण्याचा आग्रह धरला. स्वामी दयानंद सरस्वती आणि स्वामी विवेकानंद यांनी ही कल्पना पुढे नेली.
 
ते ( Mohan Bhagwat ) म्हणाले की, डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि इतर महापुरुषांचा असा विश्वास होता की समाजातील दुर्गुण दूर केल्याशिवाय सर्व प्रयत्न अपूर्ण राहतील. समाजात दोष खोलवर रुजले आहेत, हे वारंवार गुलामगिरीला बळी पडण्याचे निदर्शक आहे. डॉ. हेडगेवार यांनी ठरवले की इतरांकडे वेळ नसल्याने ते स्वतःच या दिशेने काम करतील. १९२५ मध्ये संघाची स्थापना करून त्यांनी संपूर्ण हिंदू समाजाचे संघटन करण्याचे उद्दिष्ट पुढे ठेवले.
 
हिंदू या शब्दाचा अर्थ स्पष्ट करताना ते पुढे म्हणाले की, 'हिंदू' हा शब्द केवळ धार्मिक नव्हे तर त्यात राष्ट्राप्रती जबाबदारीची भावना देखील अंतर्भुत आहे. हे नाव इतरांनी दिले होते, परंतु आपण नेहमीच स्वतःला मानवशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहत आलो आहोत. आपला असा विश्वास आहे की माणूस, मानवता आणि सृष्टी यांचा एकमेकांशी संबंध आहे आणि त्यांचा एकमेकांवर प्रभाव पडतो. हिंदू म्हणजे सर्वांना सामावून घेणारा आणि त्याला कोणतीही मर्यादा नाही. सरसंघचालक म्हणाले की, जो या तत्त्वावर विश्वास ठेवतो, स्वतःच्या मार्गाने चालतो आणि इतरांचा मार्ग बदलत नाही, तो हिंदू आहे. इतरांच्या श्रद्धेचा आदर करा, त्यांचा अपमान करू नका, ज्यांच्याकडे ही परंपरा व संस्कृती आहे ते हिंदू आहेत. आपल्याला संपूर्ण हिंदू समाजाचे संघटन करायचे आहे. हिंदू म्हणण्याचा अर्थ ‘हिंदू व्हर्सेस ऑल’ हा मुळीच नाही. ‘हिंदू’ म्हणजे सर्वसमावेशक असा अर्थ होतो.
 
ते म्हणाले की, भारताचा स्वभाव संघर्षाचा नसून, समन्वयाचा आहे. भारताच्या एकतेचे रहस्य त्याचा भूगोल, संसाधने आणि आत्मपरीक्षणाच्या परंपरेत आहे. आम्ही बाहेर पाहण्याऐवजी आत डोकावलो आणि सत्याचा शोध घेतला. या दृष्टिकोनातून प्रत्येक गोष्टीत निरनिराळ्या स्वरूपात दिसणारे तत्त्व एकच आहे, हे आम्ही शिकलो. याच कारणामुळे भारतमाता आणि पूर्वजांना आम्ही आदरणीय मानतो.
 
डॉ. मोहन भागवत ( Mohan Bhagwat ) पुढे म्हणाले की, काही लोक स्वतःला हिंदू मानतात, काही स्वतःला भारतीय किंवा सनातनी म्हणतात. शब्द बदलू शकतात, परंतु त्यामागे भक्ती आणि श्रद्धेची भावना आहे. भारताची परंपरा आणि डीएनए सर्वांना जोडणारे आहेत. विविधतेत एकता ही भारताची ओळख आहे. ते म्हणाले की, जे लोक पूर्वी आपल्यापासून अंतर ठेवून होते, ते देखील हळूहळू स्वतःला हिंदू म्हणवू लागले आहेत. कारण जेव्हा जीवनाचा दर्जा सुधारतो तेव्हा लोक मुळ संस्कृतीकडे परततात. तुम्ही हिंदूच आहात, असे आम्ही कदापि म्हणत नाही. पण तुम्ही हिंदू आहात, हे आमचे म्हणणे आहे. या शब्दांमागे कोणताही आशय नाही, त्या आशयामध्ये भारतमातेची भक्ती आणि पूर्वजांची परंपरा आहे. भारतातील लोकांचा डीएनए ४० हजार वर्षांपूर्वीपासून एकसारखाच आहे. ते म्हणाले की, जे स्वतःला हिंदू म्हणवत आहेत त्यांचे जीवन चांगले बनवा. जे म्हणत नाहीत ते देखील म्हणू लागतील. जे काही कारणास्तव विसरले आहेत त्यांना देखील ते आठवू लागेल. पण आपल्याला संपूर्ण हिंदू समाजाचेच संघटन करायचे आहे. जेव्हा आम्ही हिंदू राष्ट्र म्हणतो तेव्हा कोणालाही दुर्लक्षित करीत आहोत, असे नाही. संघाची स्थापना कोणाच्याही विरोधात किंवा प्रतिक्रियास्वरूप झालेली नाही. हिंदू राष्ट्राचा सत्तेशी काहीही घेणेदेणे नाही.
 
संघाच्या कार्यपद्धतीबद्दल ते ( Mohan Bhagwat ) म्हणाले की, समाजाच्या उन्नतीसाठी संघ दोन मार्गांचा अवलंब करतो. पहिला, मनुष्याचा विकास करणे आणि दुसरा, त्यांच्याकडूनच सामाजिक कार्य करवून घेणे. संघ ही एक संघटना असून, मनुष्य निर्माण हे तिचे काम आहे. संघाचे स्वयंसेवक विविध क्षेत्रात काम करतात, परंतु संघाचे त्यांच्यावर नियंत्रण नाही. समाजाकडून संघाचा विरोधही झाला आणि त्याची उपेक्षाही झाली. तथापि, संघाने नेहेमीच समाजाला आपले मानले.
 
संघ वैयक्तिक समर्पणावर चालतो
 
संघाचे वैशिष्ट्य हे आहे की तो बाह्य स्रोतांवर अवलंबून नाही, संघाचे काम स्वयंसेवकांच्या वैयक्तिक समर्पणावर चालते. 'गुरुदक्षिणा' हा संघाच्या कार्यपद्धतीचा एक अविभाज्य भाग आहे, ज्याद्वारे प्रत्येक स्वयंसेवक संघटनेबद्दलची आपली श्रद्धा आणि वचनबद्धता व्यक्त करतो. ही प्रक्रिया निरंतर चालू राहते. स्वय़ंसेवकांचे विचार, मूल्ये आणि आचरण योग्य राहावे यासाठी आम्ही प्रयत्नरत असतो.