Gaming Crime : गेमिंगचं व्यसन... आणि इंजिनिअर झाला चोर ?

Top Trending News    01-Sep-2025
Total Views |

gaming 
नागपूर : (Gaming Crime) गेमिंगचे व्यसन सद्य तरुणांना गुन्ह्याच्या खाईत लोटत आहे. या व्यसनामुळे ते जाणीवपूर्वक किंवा नकळत गुन्हेगारीच्या दलदलीत अडकत आहेत. या व्यसनामुळे त्याच्यावर लाखो रुपयांचे कर्ज होते. हे कर्ज फेडण्यासाठी ते चुकीच्या मार्गाचा अवलंब करतात. शनिवारी इतवारी येथील कक्कड ज्वेलर्सच्या दुकानात असाच एक गंभीर प्रकार घडला. आरोपी एका चांगल्या कुटुंबातील आहे. त्याचे अभियांत्रिकीचे शिक्षण झाले आहे. त्याची पत्नी आणि भाऊ बँकेत नोकरीला आहेत. त्याचे वडीलही एका शाळेत नोकरीला होते. जुगाराच्या व्यसनामुळे (Gaming Crime) तो कर्जबाजारी झाला होता. कर्जदारांनी त्याला त्रास देण्यास सुरुवात केली होती. काही काळापासून तो पैसे देऊ शकत नव्हता. शनिवारी, इतवारीला गेल्यानंतर, तो दागिन्यांच्या दुकानात शिरला आणि त्याने डाव साधला.
 
तहसील पोलिस ठाण्यांतर्गत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे, ज्यामध्ये गेमिंगच्या व्यसनामुळे (Gaming Crime) एक तरुण अभियंता आरोपी बनला. तो ब्रेसलेट खरेदी करण्याच्या बहाण्याने इतवारी येथील कक्कड ज्वेलर्समध्ये घुसला. त्याने त्याच्या हातावर दोन ब्रेसलेट वापरून पाहिले. त्यानंतर, गाडीतून क्रेडिट कार्ड आणण्याच्या बहाण्याने दोन्ही ब्रेसलेट घेऊन फरार झाला. मात्र गुन्हे शाखा युनिट ३ च्या पथकाने तक्रार दाखल झाल्यानंतर २४ तासांच्या आत आरोपीला शोधून काढत बेड्या ठोकल्या. शुभम परसराम डुकरे (२९) रा. कीर्तीनगर, दिघोरी हुडकेश्वर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुभमला ऑनलाईन गेमिंगचे व्यसन आहे.
 
गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने संयुक्तपणे या प्रकरणाचा तपास सुरू केला. पथकाचे उपनिरीक्षक मधुकर काटोके आणि सहकाऱ्यांनी गुप्त माहिती आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने शुभमचा शोध घेऊन त्याला अटक केली. त्याच्याकडून सुमारे ५.७५ लाख रुपये किंमतीचा माल जप्त (Gaming Crime) केला. यामध्ये ४.८० लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दोन ब्रेसलेट, गुन्ह्यात वापरलेले दुचाकी वाहन आणि मोबाईलचा समावेश आहे. पुढील कार्यवाहीसाठी आरोपीला जप्त मालासह तहसील पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.