नागपूर : ( Political Blunder ) महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला सध्या चांगलाच वेग आला आहे. मर्यादित वेळेमुळे सकाळी ८ वाजल्यापासूनच प्रभागांमध्ये बैठका, जनसंपर्क आणि प्रचारसभा सुरू होतात. बहुतांश उमेदवार दररोज फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅपसह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून जनतेकडे आशीर्वाद मागणारे व्हिडिओ अपलोड करत आहेत. दरम्यान, प्रचाराच्या धावपळीत काही मनोरंजक तसेच चर्चेचा विषय ठरणाऱ्या घटना घडत आहेत.
प्रभाग २२ मधील असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतो आहे. या व्हिडिओमध्ये एका पक्षाच्या महिला उमेदवाराने ( Political Blunder ) भाषणादरम्यान चक्क स्वतःची ओळख विरोधी पक्षाच्या उमेदवार म्हणून करून दिल्याने उपस्थितांमध्ये एकच हश्या पिकला. प्रभाग २२ मधील एका झोपडपट्टी परिसरात काँग्रेस पक्षाची जाहीर सभा सुरू होती. या सभेत महिला उमेदवाराला भाषणासाठी ( Political Blunder ) मायक्रोफोन देण्यात आला. मात्र, भाषणाच्या सुरुवातीलाच तिने स्वतःची ओळख भाजपची उमेदवार म्हणून करून दिल्याने उपस्थित प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकला. तिच्या मागे उभ्या असलेल्या पक्षाच्या एका अधिकाऱ्याने तात्काळ तिची चूक दुरुस्त केली. चूक लक्षात येताच महिला उमेदवार गोंधळून गेली व तिला लाज वाटल्याचे स्पष्टपणे दिसून आले. त्यानंतर तिने पुन्हा भाषण सुरू केले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ काही मिनिटांतच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अनेक चर्चांना उधाण
या घटनेनंतर परिसरात तसेच सोशल मीडियावर चर्चांची मालिका सुरू झाली आहे. महिला उमेदवाराला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. काही राजकीय कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, सक्षम व अनुभवी उमेदवारांना डावलून केवळ पती किंवा कुटुंबातील सदस्यांच्या जागी राजकारणाचा अनुभव नसलेल्या गृहिणींना उमेदवारी दिल्यास अशा घटना घडणे अटळ आहे. मात्र, यात उमेदवाराची वैयक्तिक चूक नसून पक्षाची रणनीतीच जबाबदार असल्याचेही मत व्यक्त केले जात आहे. दुसरीकडे, भाजप कार्यकर्त्यांकडून ( Political Blunder ) या घटनेवर उपरोधिक प्रतिक्रिया देण्यात येत असून, “भाजपने केलेल्या विकासकामांचा प्रभाव इतका आहे की विरोधी पक्षाचे उमेदवारही अनाहूतपणे भाजपचे नाव घेत आहेत,” अशी टीका केली जात आहे.
सोशल मीडियावर प्रचार अधिक आक्रमक
दरम्यान, ई-रिक्षांच्या माध्यमातून रस्त्यांवर प्रचार सुरू असतानाच फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर निवडणूक प्रचार अधिक आक्रमक होताना दिसत आहे. महापालिकेत ( Political Blunder ) गेल्या १५ वर्षांपासून सत्तेत असलेले भाजपचे उमेदवार आपल्या सरकारच्या विकासकामांचा दाखला देत मते मागत आहेत. तर काँग्रेससह इतर पक्षांचे उमेदवार भाजपवर विकासातील भेदभाव, तसेच गेल्या आठ वर्षांत माजी नगरसेवकांच्या अनुपस्थितीचा मुद्दा उपस्थित करत आहेत. झोपडपट्टी भागात जाऊन उमेदवार थेट नागरिकांना प्रश्न विचारत आहेत की, “तुमचे नगरसेवक गेल्या आठ वर्षांत किती वेळा तुमच्याकडे आले?” नागरिकांकडूनही सोशल मीडियावर सकारात्मक व नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात असून, प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात ही आक्रमकता आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. निवडणुकीस अवघे आठ दिवस शिल्लक असल्याने प्रचाराचा सूर अधिकच तीव्र होणार, हे स्पष्ट आहे.