Temple Transformation : अमरावतीच्या हनुमान गढीसाठी १२१ कोटींचा महाप्लॅन ! कल्याणेश्वर मंदिर परिसराचा कायापालट

Top Trending News    06-Mar-2026
Total Views |

gadi
 
नागपूर : ( Temple Transformation ) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील विधान भवनात हनुमान गढी परिसर आणि कल्याणेश्वर मंदिर महालच्या प्रस्तावित विकास आराखड्यासंदर्भात शिखर समितीची बैठक संपन्न झाली. अमरावती शहरालगत हनुमान गढी परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्यासाठी 121 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. उपराजधानीच्या महालातील कल्याणेश्वर मंदिर परिसराचाही विकास केला जाणार आहे.
 
अमरावती शहरालगत असलेल्या हनुमान गढी परिसरात पर्यटकांच्या सुविधांची कामे आधी पूर्ण करावीत. ही कामे दर्जेदार असावीत. या पर्यटन केंद्राचे मुख्य आकर्षण असलेल्या हनुमान मूर्तीचे काम पूर्ण करावे. संपूर्ण परिसर उत्कृष्ट धार्मिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करावा, असे निर्देश ( Temple Transformation ) मुख्यमंत्र्यांनी दिले.
 
विकास आराखड्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. सर्व कामे विहित कालमर्यादेत पूर्ण करावी. हनुमान गढी स्थळाच्या विकासानंतर हे ठिकाण अमरावती शहरालगत पर्यटकांसाठी एक पर्वणी ठरणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस ( Temple Transformation ) यांनी व्यक्त केला. यावेळी मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार प्रताप अडसड, आमदार प्रवीण दटके, आमदार रवी राणा व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
 
कल्याणेश्वरचा विकास
 
शहरातील महाल परिसरात असलेल्या पुरातन कल्याणेश्वर मंदिर परिसराचा विकास करण्यात येणार आहे. मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या मंदिराचा विकास करताना परिसरात पार्किंगची व्यवस्था उभारण्यात यावी. मोठ्या संख्येने वाहनांची पार्किंग होईल, अशा पद्धतीने व्यवस्था करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.
 
विकास आराखड्याची वैशिष्ट्ये :
 
1) हनुमान गढीचा विकास 17 हजार 671 चौरस मीटर क्षेत्रावर होईल
2) अयोध्येतील राम मंदिर यज्ञ मंडपाच्या प्रतिकृतीवर आधारित यज्ञ मंडप
3) ॲम्फीथिएटर, फूड मॉल, क्राफ्ट सेंटर आणि आखाडा
4) महाप्रसाद हॉल, बहुउद्देशीय सभागृह आणि हनुमान गॅलरी
5) दिव्यांग स्नेही रस्ते आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग
6) मुख्य प्रवेशद्वार, संरक्षण भिंत आणि लेझर शो