नागपूर : ( Vijay Wadettiwar ) एसबीएल कंपनीत झालेला भीषण स्फोट प्रशासन आणि व्यवस्थापनाने केलेले हत्याकांड आहे. संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी विधानसभेत केली. स्फोटात १९ जणांचा मृत्यू झाला. मात्र, गुन्हा नोंदवताना अशी कलमे का लावली की, आरोपींना एक दिवसातच जामीन मिळेल. मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल का केला नाही, असा सवाल लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून वडेट्टीवार ( Vijay Wadettiwar ) यांनी केला.
प्राथमिक चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. कंपनीत फायर पंप नव्हते, रिस्क असेसमेंट केलेले नव्हते, नियमानुसार दोन सेफ्टी ऑफिसर अपेक्षित असताना एकच होता. कंपनीने नियुक्त केलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. शशांक डोंगरे कधीच तिथे गेले नाही, सीसीटीव्ही नव्हते आणि इंटरनल सेफ्टी ऑडिटची कोणतीही नोंद नाही. स्फोटके हाताळण्याचे प्रशिक्षण कामगारांना दिलेले नव्हते, अशी माहिती त्यांनी ( Vijay Wadettiwar ) सभागृहाला दिली.
दीड वर्षात इतके स्फोट झाले तरी सरकार काय कारवाई करीत आहे, अधिकाऱ्यांना पाठीशी का घालत आहे, असे सवाल करून वडेट्टीवार म्हणाले, मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. सुरक्षा निरीक्षक व पेसो अधिकाऱ्यांना निलंबित करून सहआरोपी करा, स्फोटांचा प्रत्यक्ष साठा व परवानगीचा ताळेबंद तपासावा.
विरोधी पक्षाचा सभात्याग
कंपनीवर सहावेळा गुन्हा दाखल झाल्याचे तपासात समोर आले. कंपनी बंद करण्याचे आदेश जारी केले आहे. मालक व सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिली. यात हस्तक्षेप करून मंत्री आकाश फुंडकर यांनी उत्तर दिले. मात्र, मंत्र्यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने विरोधी पक्षाने सभात्याग केला.