वसई : ( 5G Revolution ) पुणे, नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये ५जी सेवांना मिळालेल्या उस्फुर्त प्रतिसादानंतर, देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी ‘वी’ आता महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये आपल्या ५जी सेवांचा वेगवान विस्तार करत आहे. राज्यातील आपले नेटवर्क अधिक मजबूत करण्यासाठी, कंपनीने ८ महत्त्वाच्या शहरांमध्ये ५जी सेवा सुरू केल्याची घोषणा केली आहे. यामध्ये कोल्हापूर, वसई, नांदेड, जळगाव, सातारा, मालेगाव, शिर्डी आणि धुळे यांचा समावेश आहे. आपल्या नियोजित विस्तार योजनेचा भाग म्हणून, मे २०२६ पर्यंत ‘वी’ आपली ५जी सेवा ( 5G Revolution ) अकोला, मिरज, चंद्रपूर, सोलापूर, उल्हासनगर, भिवंडी, अहिल्यानगर, अमरावती, लातूर आणि गोवा यांसह आणखी दहा शहरांमध्ये सुरू करणार आहे.
आपल्या ५जी सेवांचा ( 5G Revolution ) विस्तार करण्यासाठी ‘वी’ ने औद्योगिक कॉरिडॉर, उच्च डेटा वापर असलेली केंद्रे आणि नव्याने विकसित होत असलेल्या शहरी क्लस्टर्ससह प्रमुख बाजारपेठांना प्राधान्य दिले आहे. या शहरांमधील नियोजित विस्तार संपूर्ण महाराष्ट्र भर सेवा पसरवण्याचा ‘वी’ चा धोरणात्मक दृष्टिकोन दर्शवतो; महाराष्ट्र हे भारताचे 'आर्थिक पॉवरहाऊस' असून देशाच्या एकूण जीडीपीमध्ये राज्याचा वाटा १३ टक्क्यांहून अधिक आहे. औद्योगिक केंद्रे, कृषी केंद्रे आणि पर्यटन स्थळे अशा विचारपूर्वक निवडलेल्या विविध ठिकाणांवर लक्ष केंद्रित करून, ‘वी’ या उच्च-क्षमता असलेल्या बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर डिजिटल परिवर्तन आणि शाश्वत विकासासाठी आवश्यक असलेल्या ५जी पायाभूत सोयीसुविधा तैनात करत आहे.
या विस्ताराबाबात वोडाफोन आयडियाचे क्लस्टर बिझनेस हेड (महाराष्ट्र आणि गोवा) आनंद दाणी सांगतात, “आम्ही महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठांमध्ये आमचे अस्तित्व अधिकाधिक मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहोत. त्याबरोबरीनेच संपूर्ण राज्यात 'वी'च्या ५जी नेटवर्कच्या ( 5G Revolution ) विस्ताराला गती देत आहोत. पुणे, नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर यांसारख्या शहरांमधील आमच्या उपस्थितीच्या जोरावर, आता आम्ही अजून ८ शहरांमध्ये विस्तार करत आहोत आणि टप्प्याटप्प्याने अनेक इतर शहरांमध्ये प्रगती करत आहोत. आमचा हा विस्तार उच्च डेटा वापर आणि मागणी असलेल्या ठिकाणांना प्राधान्य देण्याच्या स्पष्ट हेतूने केला जात आहे, जेणेकरून आमच्या ग्राहकांना सातत्यपूर्ण आणि सुधारित नेटवर्क अनुभव मिळत राहील.”