नागपूर : (Cough Syrup Death) आरोग्य विभागात सध्या ‘कफ सिरप’ च्या बाबतीत एकाच खळबळ माजली असून केंद्र सरकारचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयही खडबडून जागे झाले आहे. विषारी कफ सिरपचा प्रश्न सध्या शहरातच नव्हे तर देशभरात चर्चेत आहे. बदलत्या हवामानामुळे लहान मुलांना सर्दी खोकला होण्याचे प्रमाण अधिक असते. सर्रासपणे पालक मुलांना सर्दी खोकला झाल्यानंतर कफ सिरप देतात. दूषित ‘कफ सिरप’मुळे काही बालकांचा मृत्यू झाल्याच्या घटना पुढे आल्यानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे.
केंद्र सरकारने (Cough Syrup Death) कफ सिरपच्या वापराबाबत दिशानिर्देश जारी केले असून महापालिकेने ते शहरातील सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयांना पाठवले आहे. दरम्यान, शहरात मेंदूज्वराचे १२ रुग्ण दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. कोल्ड्रिफ कफ सिरप पिल्याने झालेल्या मुलांच्या मृत्यूनंतर, नागपूरमधील अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) सतर्क झाले आणि त्यांनी संपूर्ण जिल्ह्याच्या बाजारपेठेची तपासणी केली, परंतु कोल्ड्रिफ सिरपचा कोणताही पुरवठा आढळला नाही. परंतु या चौकशीदरम्यान, विभागाला माहिती मिळाली की एका औषध वितरकाने रुग्णाला लिहून दिलेल्या औषधात ‘ऑन्डेनसेट्रान’ हे उलट्याविरोधी उत्पादन आढळले आहे. विभागाने या औषधाचा नमुना घेतला आणि त्याच्या विक्रीवर बंदी घातली.
आज महापालिकेने (Cough Syrup Death) भारत सरकारच्या दिशानिर्देशाचे शहरात पालन व्हावे यादृष्टीने रुग्णालयांना पत्राद्वारे सूचना दिली आहे. सद्यस्थितीत नागपूर शहरातील शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये ० ते १६ वर्ष वयोगटातील संशयित मेंदूज्वराचे (एइएस) एकूण १२ रुग्ण आहेत. यातील मध्यप्रदेशातील १० व महाराष्ट्रातील १ आणि तेलंगणाचा १ रुग्ण आहे. यापैकी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) ६ रुग्ण उपचार घेत आहेत. एम्समध्ये २ रुग्ण, न्यू हेल्थ सिटी हॉस्पिटल, लता मंगेशकर हॉस्पिटल, कलर्स हॉस्पिटल आणि गेट वेल हॉस्पिटल प्रत्येक १ रुग्ण उपचार घेत आहेत. महाराष्ट्रातील रुग्ण हा शहरातील यशोधरानगरातील आहे.
२ वर्षांखालील मुलांना कफ सिरप धोकादायक !
केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या दिशानिर्देशामध्ये लहान मुलांमध्ये खोकल्याचे (Cough Syrup Death) आजार हे स्वतःहून बरे होतात, अनेकदा ते औषधाशिवाय बरे होतात. यासाठी पुरेसा आराम आणि जास्त पाणी पिल्यामुळे व इतर गैरऔषधी उपाययोजना हे प्रथमोपचार पुरेसे असते, असे नमुद केले आहे. त्यामुळे २ वर्षाखालील मुलांना सर्दी व खोकल्याकरिता औषध देणे टाळावे, असा सल्ला देण्यात आला आहे. ५ वर्षावरील मुलांना आवश्यकता असल्यास काळजीपूर्वक वैद्यकीय सल्ल्यानुसार व देखरेखीतच योग्य डोसमध्ये औषध द्यावी. बहु औषधांचे संयोजन टाळावे. वैद्यकीय सल्ल्यानुसारच औषध घेण्याचे आवाहन देखील महापालिकेने केले आहे.