नागपूर : (Illegal Hoardings) नागपूर महानगरपालिकेने शुक्रवारी शहरातील बेकायदेशीर फ्लेक्स, होर्डिंग्ज, बॅनर आणि कटआऊट्स लावणाऱ्या राजकीय व सामाजिक व्यक्तींची नावे असलेले प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले. उच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन केल्याबद्दल प्रतिव्यक्ती ५ लाखांचा दंड ठोठावण्याचे संकेत दिले आहे.
पालिकेच्या प्रतिज्ञापत्रानुसार, सर्वाधिक म्हणजे २०० बेकायदेशीर बॅनर (Illegal Hoardings) शिवसेना (शिंदे गट) नेते किरण पांडव यांनी लावले. त्यानंतर भाजप नेते डॉ. राजेश धर्मरावबाबा आत्राम यांनी १५३ बॅनर लावल्याचे आढळून आल्याचे पालिकेने स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील ठाकूर आणि सुधाकर माने यांनी १०० बॅनर, तर शिवसेना (युबीटी) चे संजय देवरकर व अरुण खान तसेच आरपीआयचे अण्णासाहेब बनसोडे यांनी प्रत्येकी ५० बॅनर लावल्याचे पालिकेने स्पष्ट केले. महानगरपालिकेने ५५३ बेकायदेशीर बॅनर (Illegal Hoardings) जप्त केले. अॅड. तुषार मांडलेकर यांनी याचिकाकर्त्यांची बाजू मांडली.
मनपाने बेकायदेशीर फलक (Illegal Hoardings) लावणाऱ्या १०० हून अधिक व्यक्तींची यादी न्यायालयात दिली. त्यात अशोक जैन, सुमुख मिश्रा (शिवसेना–शिंदे), प्रकाश मेहाडिया (भाजप), प्रसन्ना पातुरकर (भाजप), चंद्रपाल चौकसे, अश्विन धनविजय (संविधान दिनी), जगदीश खापेकर, सचिन तुमाने (भाजप), चरणदीप हॅपी सिंग, एअरटेल एचडी वाय-फाय आणि टेक्निकल इंटरनॅशनल एज्युकेशन कौन्सिलचा समावेश आहे.