Kolhapuri Chappal : फॅशनविश्वात देशी ठसा ! कोल्हापुरी चप्पलची प्राडासोबत मोठी डील

13 Dec 2025 15:00:14

kolha
 
नागपूर : ( Kolhapuri Chappal ) कोल्हापूरची खरी ओळख असलेली कोल्हापुरी चप्पल आता जागतिक बाजारपेठेत धुमाकूळ घालणार आहे. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी भारतीय पारंपरिक चर्मकला आणि कोल्हापुरी चपलांचा ( Kolhapuri Chappal ) शेकडो वर्षांचा वारसा जगभरातील उच्चभ्रू फॅशन मार्केटमध्ये पोहोचणार असल्याचे जाहीर केले आहे. या करारानुसार, पारंपरिक कोल्हापुरी चप्पल निर्मितीची शतकानुशतके जुनी पद्धत, प्राडाच्या आधुनिक आणि समकालीन डिझाइनच्या मदतीने विकसित केली जाईल. पारंपरिक भारतीय कौशल्ये आणि आधुनिक लक्झरी फॅशन तंत्रज्ञानाच्या संयोगाने या चपलांना एक जागतिक ओळख मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
जागतिक लक्झरी ब्रँड 'प्राडा' सोबत महाराष्ट्राचे लिडकॉम (संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळ) आणि लिडकारचा (डॉ. बाबू जगजीवनराम महामंडळ) सामंजस्य करार झाला असून, मुंबईतील इटालियन वाणिज्य दूतावासात इटली-भारत व्यापारी परिषदेच्या निमित्ताने या करारावर स्वाक्षरी करण्यात आल्याचे संजय शिरसाट यांनी सांगितले.
 
चक्क ८४ हजारांची चप्पल
 
या चपला ( Kolhapuri Chappal ) फेब्रुवारी २०२६ पासून प्राडाच्या जगभरातील ४० विक्रीकेंद्रांमध्ये आणि त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर विक्रीसाठी उपलब्ध असतील असे शिरसाठ म्हणाले. हा करार लिडकॉमचे अध्यक्ष डॉ. हर्षदीप कांबळे आणि लिडकॉमच्या व्यवस्थापकीय संचालक प्रेरणा देशभ्रतार यांच्या उपस्थितीत करण्यात आला. खास डिझाइन असलेल्या चपलांची ( Kolhapuri Chappal ) किंमत सुमारे ८०० युरो म्हणजेच भारतीय बाजारमुल्यानुसार ८४ हजार राहण्याची त्यांनी शक्यता वर्तवली.
 
कारागिरांना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण
 
- 'प्राडा मेड इन इंडिया इन्स्पायर्ड बाय कोल्हापुरी चप्पल्स' या स्लोगनअंतर्गत आराखडा
- अंमलबजावणीचे नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे निश्चित
- या चपला महाराष्ट्रासह कर्नाटकातील पारंपारिक कारागीर भारतातच बनवतील
- कारागिरांना प्राडाच्या माध्यमातून परदेशात प्रशिक्षण देण्यात येईल.
- येत्या पंधरा दिवसांमध्ये प्राडा कोल्हापुरी चप्पलचे सहा आउटलेट सुरू होतील.
- त्यात दर्यापूर, हिंगोली यांसारख्या शहरांचा समावेश असेल.
- फेब्रुवारी २०२६ पर्यंत जगभरात हे आउटलेट सुरू होतील. ( Kolhapuri Chappal )
Powered By Sangraha 9.0