Sangram Thopte In BJP : "काँग्रेसला धक्का ! संग्राम थोपटे भाजपच्या वाटेवर"

19 Apr 2025 15:51:45


sb
 
पुणे : ( Sangram Thopte In BJP ) भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे काँग्रेसला रामराम ठोकून भाजपात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. येत्या रविवारी त्यांच्या प्रवेशाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता असून, भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने हा निर्णय झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. थोपटे ( Sangram Thopte In BJP ) यांनी पक्षातील भविष्यातील भूमिकेसंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट घेतली आहे.
 
 
थोपटे कुटुंबाचा भोर मतदारसंघात दीर्घ राजकीय वारसा आहे. संग्राम थोपटे तिनदा आमदार राहिले असून, त्यांचे वडील अनंतराव थोपटे सहा वेळा आमदार झाले आहेत. गांधी कुटुंबाशी असलेले त्यांचे जवळचे संबंधही राजकीय वर्तुळात ओळखले जातात. मात्र काँग्रेसची सध्याची घसरण लक्षात घेता थोपटे ( Sangram Thopte In BJP ) यांनी भाजपातच भविष्यातील संधी असल्याचे मानले आहे.
 
2024 चा पराभव आणि पुढील वाटचाल
 
2024 च्या विधानसभा निवडणुकीत संग्राम थोपटे यांना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे शंकर मांडेकर यांनी पराभूत केले. त्यानंतर गुरुवारी थोपटे यांनी आपल्या कार्यकर्त्यांची विशेष बैठक घेत आगामी राजकीय निर्णयाबाबत चर्चा केली. लवकरच काँग्रेसमधून औपचारिकपणे बाहेर पडण्याची त्यांची शक्यता आहे.

साखर कारखान्यावर आलेले संकट
 
राजगड सहकारी साखर कारखाना, ज्याचे अध्यक्षपद थोपटे यांच्याकडे आहे. सध्या आर्थिक अडचणीत आहे. राज्य सरकारने याला 80 कोटींचे कर्ज मंजूर केले होते. मात्र लोकसभा निवडणुकीत थोपटे यांनी सुप्रिया सुळे यांना मदत केल्यामुळे अजित पवार नाराज झाले आणि त्यांनी कारखान्यासाठी मंजूर झालेली मदत रोखली. या पार्श्वभूमीवर, कारखाना वाचवण्यासाठी भाजपात प्रवेशाचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
 
राजकीय प्रवास
 
संग्राम थोपटे यांचा राजकीय प्रवास भोर पंचायत समितीचे उपाध्यक्ष (2002-03) म्हणून सुरू झाला. त्यानंतर ते पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक (2007-2024) आणि राजगड साखर कारखान्याचे अध्यक्ष होते. 2009, 2014 आणि 2019 मध्ये त्यांनी विधानसभेवर विजय मिळवला. परंतु, 2024 मध्ये पराभवाला सामोरे जावे लागले.
 
 
Powered By Sangraha 9.0