Rewa Madhya Pradesh Scam : "पत्नीच्या नोकरीवर पतीचा डल्ला ! मध्य प्रदेशात शासनाला ५५ लाखांचा गंडा"

20 Apr 2025 17:26:58

rewa
 
रेवा : ( Rewa Madhya Pradesh Scam ) मध्य प्रदेशातील रेवा जिल्ह्यात एक खळबळजनक घोटाळा उघडकीस आला आहे. बनसागर प्रकल्पात संगणक ऑपरेटर म्हणून नियुक्त असलेल्या एका महिलेच्या नावावर तिचा पती वर्षानुवर्षे काम करत असल्याचे समोर आले आहे. या काळात तब्बल ५५ लाख रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे. आरोपी संतोष गुप्ता याने आपल्या पत्नी दुर्गेश गुप्ता यांच्या जागी कार्यालयात उपस्थित राहून काम केले. विशेष म्हणजे, त्याच्यावर यापूर्वीही अनेक प्रकरणांमध्ये फसवणुकीचे आरोप ( Rewa Madhya Pradesh Scam ) नोंदवले गेले आहेत.
 
मृत कर्मचाऱ्याच्या खात्यातून ३५ लाखांची फसवणूक
 
तपासात उघड झाल्यानुसार, संतोष गुप्ताने विभागातील एका मृत कर्मचाऱ्याच्या गिरीश कुमार मिश्रा खात्यात जमा झालेले ३५ लाख रुपये आपल्या खात्यात ट्रान्सफर केले. विशेष म्हणजे, मिश्रा यांचे फक्त १.६ लाख रुपये थकबाकी होते. उर्वरित रक्कम संतोषने कौशल्याने आपल्या खात्यात वळती ( Rewa Madhya Pradesh Scam ) केली.
 
पती-पत्नी दोघांविरोधात एफआयआर
 
रेवा पोलिसांनी संतोष आणि दुर्गेश गुप्ता यांच्याविरोधात फसवणूक, बनावट कागदपत्रे सादर करणे व सरकारी मालमत्तेचा अपहार अशा गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस अधीक्षक शिवाली चतुर्वेदी यांनी सांगितले की, संतोषने २०१९-२० व २०२१ मध्ये एकूण ५५ लाखांहून अधिक रकमेची फसवणूक केली आहे.
 
इतर प्रकरणांमध्येही सहभाग
 
तपासात असेही समोर आले आहे की, गुप्ता दाम्पत्याने नया गढी या सूक्ष्म दाब सिंचन प्रकल्पातही आर्थिक गैरव्यवहार केला. २०१९-२० मध्ये त्यांनी ३६.९४ लाख रुपयांचा, तर २०२०-२१ मध्ये १८.४३ लाख रुपयांचा अपहार केल्याचे नोंद आहे.
 
बनसागर प्रकल्पातील गैरव्यवहारांची मालिका
 
बनसागर प्रकल्प सुरू झाल्यापासून त्यात गैरव्यवहाराची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. लोकायुक्त कार्यालयाने अनेक अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून, अद्याप अनेक प्रकरणांचा तपास सुरू आहे. अनेक आरोपींचा मृत्यू झाल्यामुळे न्यायालयीन प्रक्रिया रखडलेली आहे.
Powered By Sangraha 9.0