Mysterious Metal Fall : उमरेड मध्ये आकाशातून कोसळला धातूचा तुकडा, उपग्रहाचा भाग असल्याची शक्यता !

21 Apr 2025 13:41:06

mysterious
 
नागपूर : ( Mysterious Metal Fall ) जिल्ह्याच्या उमरेड तालुक्यात शनिवारी पहाटे चार वाजता एक धक्कादायक घटना घडली. कोसे लेआऊट भागातील अमय बसवेश्वर यांच्या घरावर अचानक आकाशातून एक मोठा धातूचा तुकडा कोसळला ( Mysterious Metal Fall ). या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाशातून मोठा आवाज करत आलेला हा तुकडा थेट घराच्या छतावर आदळला. या आवाजामुळे घरातील आणि परिसरातील लोक घाबरून बाहेर आले. तुकड्याच्या धडकेत घराच्या छतावरील भिंतीचा काही भागही तुटला.
 
 
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून तपास सुरू केला. सदर तुकडा नेमका कशाचा आहे, याचा अद्याप खुलासा झालेला नसून अधिकाऱ्यांनी तो पुढील तपासासाठी पोलीस ठाण्यात नेला आहे. हा धातूचा तुकडा अंदाजे 50 किलो वजनाचा असून, सुमारे 10 ते 12 मिमी जाडीचा आणि सुमारे चार फूट लांब आहे. तज्ञांच्या प्राथमिक अंदाजानुसार, हा तुकडा एखाद्या उपग्रहाचा अथवा अवकाशातून खाली आलेल्या अवशेषाचा असू शकतो.
 
दरम्यान, हा तुकडा नेमका कसा आणि कुठून आला याची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. स्थानिक प्रशासन आणि वैज्ञानिक विभाग देखील या घटनेकडे गांभीर्याने पाहत असून तपास पूर्ण होईपर्यंत परिसरातील नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0