Fisheries Growth : मत्स्यव्यवसायाला नवे पंख ! राणेंचा पुढाकार ठरणार निर्णायक

22 Apr 2025 19:58:07

rane
 
मुंबई : ( Fisheries Growth ) नागपूर जिल्ह्यातील तलावातील गाळ काढणे आणि अतिक्रमण निष्कासित करण्याच्या प्रक्रियेस गती देण्यात यावी. स्थानिक मच्छिमारांचे उत्पादन वाढविण्यासाठी उच्च दर्जाचे मत्स्यबीज उपलब्ध करणे तसेच पावसाळ्यापूर्वी तलावांमधील गाळ काढण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले. नागपूर जिल्ह्यातील मत्स्यव्यवसाय कामांसंदर्भात ( Fisheries Growth ) आढावा बैठक मंत्रालय येथील दालनात झाली. यावेळी आयुक्त किशोर तावडे, प्रादेशिक उपायुक्त सुनील जांभुळे आणि अधिकारी उपस्थित होते.
 
मत्स्यव्यवसाय मंत्री राणे म्हणाले की, पर्यटनाच्या दृष्टीने राष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय उभारण्यासाठी गोरेवाडा प्राणी संग्रहालयाच्या परिसरातील जागा निश्चितीकरण करून या संदर्भातील प्रस्ताव तातडीने सादर करावा. १६३०१ हेक्टर क्षेत्रात असलेल्या जलाशय मासेमारीकरिता लिलावात देण्यात यावे. यासंदर्भात कार्यवाही करून तातडीने अहवाल सादर करण्यात यावेत. विदर्भातील गोड्या पाण्यातील मत्स्यव्यवसाय वाढवावा, मत्स्य व्यावसायिकांना बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावेत. मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण व कौशल्य विकास केंद्र उभारावे, मत्स्यबीज उत्पादन केंद्र, मत्स्य बीज संगोपन केंद्र उभारण्यासाठीच्या कार्यास गती देण्याचे निर्देशही मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिले.
Powered By Sangraha 9.0