नागपूर : ( Unsafe Infrastructure In Nagpur ) सुयोगनगर परिसरात 10 महिन्यांपासून सुरू असलेल्या ड्रेनेज लाईनच्या रखडलेल्या कामामुळे नागरिकांचा संयम सुटू लागला आहे. रस्त्याच्या कडेला उघड्या लोखंडी सळाख्या, पसरलेली रेती व गिट्टी, तसेच अपूर्ण कामामुळे नागरिक जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. काही दिवसांपूर्वी एका गायीला आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना अपघात झाल्यानंतरही महापालिकेचे ( Unsafe Infrastructure In Nagpur ) व ठेकेदाराचे डोळे उघडलेले नाहीत, अशी नागरिकांची तीव्र नाराजी आहे.
सुरक्षेचा अभाव, अपघातांना आमंत्रण
या अपूर्ण कामांभोवती कुठलेही बॅरिकेड्स नाहीत, ना स्टिकर, ना इशारे देणारे फलक. रात्रीच्या वेळी अंधारात या सळाख्यांचे अस्तित्वच दिसत नाही, त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता सतत वाढत आहे.
दिव्यांग विद्यार्थ्यांचा थोडक्यात बचाव
अलीकडेच एका ऑटोला अपघात झाला, ज्यात दिव्यांग विद्यार्थ्यांना दुखापत झाली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांनी अधिकाऱ्यांकडे तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे.
ठेकेदाराला जबाबदार धरण्याची मागणी
नागरिकांचा रोष ठेकेदाराच्या निष्काळजीपणावर आहे. “सामान्य नागरिकांना दंड करणाऱ्या महापालिकेने ठेकेदारावरही दंड आणि गुन्हा दाखल करावा,” अशी संतप्त प्रतिक्रिया व्यापारी शंकर सिंग्रोल यांनी दिली.
प्रशासनाचे दुर्लक्ष ?
महापालिकेचे उपद्रव शोध पथक अशा अर्धवट आणि धोकादायक कामांवर लक्ष ठेवत नाही, हे प्रशासनाच्या निष्क्रियतेचे लक्षण असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.