Railway Job Scam : रेल्वेत नोकरीचं आमिष ! निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला 9.64 लाखांना गंडा

23 Apr 2025 20:26:38

bhusawal
 
भुसावळ : ( Railway Job Scam ) रेल्वेतील नोकरीचं आमिष दाखवत एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला तब्बल 9 लाख 64 हजार रुपयांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी प्रशांत लक्ष्मीनारायण अग्रवाल (रा. गडकरी नगर, भुसावळ) याच्याविरुद्ध फसवणूक आणि विश्वासघाताचा गुन्हा बाजारपेठ पोलिस ठाण्यात दाखल ( Railway Job Scam ) करण्यात आला आहे.
 
वसंत जानबाजी ढोणे (वय 66) हे रेल्वे पोलिस दलातून निवृत्त झाले आहेत. त्यांची एका परिचित महिलेमार्फत आरोपी प्रशांत अग्रवालशी ओळख झाली होती. ढोणे यांचा मुलगा रेल्वेत 'हेड क्लार्क' पदावर नोकरी मिळवावा यासाठी अग्रवालने त्यांना आमिष दाखवले आणि 7 लाख रुपये मागितले. विश्वास ठेवून ढोणे यांनी सुरुवातीला 4 लाख रुपये आणि नंतर टप्प्याटप्प्याने एकूण 9,64,060 रुपये दिले.
 
काही महिन्यांनी अग्रवालने एक नियुक्तिपत्र दिलं, पण त्यावर ना अधिकृत स्वाक्षरी, ना शिक्का होता. संशय आल्यावर ढोणे यांनी विचारणा केली असता, अग्रवालने हे केवळ तात्पुरते पत्र असून लवकरच मूळ ऑर्डर येईल, असे सांगितले. मात्र, नंतर त्याने फोन घेणेही थांबवले. शंका बळावल्यावर ढोणे यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. सखोल चौकशीनंतर फसवणुकीचा प्रकार स्पष्ट झाला असून अग्रवालवर IPC कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0