Teacher Recruitment Scam : शिक्षक भरती घोटाळा ! बदल्यांचा कारभार अजूनही ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या हातात ?

Top Trending News    23-Apr-2025
Total Views |

shik
 
नागपूर : ( Teacher Recruitment Scam ) शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत सात जणांवर गुन्हे दाखल झाले असले, तरी प्रशासनाकडून कोणावरही अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. विशेष म्हणजे, यातील काही आरोपी कर्मचारी अजूनही विभागात कार्यरत असून, त्यांच्याकडेच महत्त्वाच्या फाईल्स असल्याची ( Teacher Recruitment Scam ) माहिती समोर आली आहे. त्यामुळे दस्तऐवजांत फेरफार किंवा पुरावे नष्ट करण्याचा धोका गडद झाला आहे.
 
आतापर्यंत अटकेत असलेल्यांमध्ये शिक्षण उपसंचालक उल्हास नरड, माध्यमिक विभागाचे अधीक्षक निलेश मेश्राम, उपनिरीक्षक संजय दुधाळकर, लिपिक सूरज नाईक, बनावट शिक्षक पराग पुडके, महेंद्र म्हैसेकर आणि एका खासगी शाळेचा संचालक मेश्राम यांचा समावेश आहे. या प्रकरणाचा तपास सायबर पोलीस व सदर पोलीस करत असून काही महत्त्वाची कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. तरीही अनेक फाईल्स अजूनही उपसंचालक कार्यालयात असून, त्या नेमक्या कोणाच्या ताब्यात आहेत, यावर प्रशासन गप्प आहे. वर्षानुवर्षे एकाच विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची साधी बदलीही झाली नसल्यामुळे संशय अधिकच बळावतो आहे.
 
अजूनही निलंबनाचे आदेश नाही
 
नरड, मेश्राम, नाईक, दुधाळकर व पुडके यांनी आज जामिनासाठी अर्ज केला होता. परंतु, त्यांचा अर्ज न्यायालयाचे फेटाळून लावला. शासकीय अधिकारी, कर्मचारी 48 तास पोलिस कोठडीत असल्यास त्याच्यावर निलंबनाची कारवाई करणे क्रमप्राप्त आहे. नरड, मेश्राम, नाईक, दुधाळकर हे गेल्या आठवडाभरात पोलिस व न्यायिक कोठडीत आहेत. परंतु, अद्याप त्यांच्या निलंबनाचे आदेश काढण्यात आले नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तर पोलिसांनी आरोपींबाबतचा अहवाल शासनाकडे पाठविला नसल्याने निलंबनाचा आदेश ( Teacher Recruitment Scam ) निघाले नाही, असे मत व्यक्त करण्यात येत आहे.
 
कर्मचारी बिभीषणच्या भूमिकेत
 
पोलिसांना तपासात वेग दिला आहे. पोलिसांनी आतापर्यंत अनेक कर्मचाऱ्यांना जवाब नोंदविण्यासाठी बोलाविले आहे. डीडी कार्यालयातील एक कर्मचारी विभीषणाच्या भूमिकेत असल्याची चर्चा आहे. संबंधित कर्मचाऱ्याकडून माहिती पुरविण्यात येत असल्याची चर्चा आहे. या प्रकरणाशी संबंधित असलेले नसलेल्या काही कर्मचाऱ्यांबाबतची माहिती त्याच्याकडून देण्यात येत असल्याची चर्चा शिक्षण विभागात आहे.